Marathi e-Batmya

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती चिंताजनक, तातडीने पुण्यात हलविले

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज दुपारी अचानक बिघडली. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने दुपारीच बारामतीहून पुण्यातील रूबी रूग्णालयात हलविण्यात आले. ८५ वर्षीय शरद पवार हे बारामतीतील त्यांच्या निवासस्थानी असताना त्यांना तीव्र अस्वस्थता जाणवू लागली. त्यांच्या वाढत्या वयाचा विचार करून स्थानिक डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुण्यातील ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात येणार असून, प्रकृती स्थिर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रवासादरम्यान खासदार सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्यासोबत असून खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्या ताफ्यात सुसज्ज रुग्णवाहिकेचाही समावेश करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंबिय दुःखात असतानाच, आता शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतच्या वृत्ताने पवार कुटुंबियात आणि पवार समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप रुग्णालयाकडून अधिकृत आरोग्य अहवाल (Medical Bulletin) प्रसिद्ध करण्यात आला नसला तरी, शरद पवार लवकर बरे व्हावेत यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रार्थना केली जात आहे.

राज्यात आज जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूकांचा निकाल जाहीर करण्यात येत आहे. मात्र शरद पवार यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याचे वृत्त कळताच सर्व राजकिय पक्षांमध्ये काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Exit mobile version