Marathi e-Batmya

शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे.

नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना  मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज २४ सप्टेंबर रोजी परंडा तालुक्यातील पुरबधित करंजा गावाच्या शिंदेवस्ती आणि करळेवस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व उपस्थित वस्तीतील नागरिकांशी संवाद साधून झालेल्या शेतीच्या नुकसानीची व मालमत्तेच्या नुकसानीची माहिती घेतली.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. आमदार प्रा.डॉ. तानाजी सावंत, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधिक्षक रितू खोखर, सहायक जिल्हाधिकारी तथा भूम उपविभागीय अधिकारी रैवैयाह डोंगरे व तहसीलदार नीलेश काकडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी करंजा गावाजवळील शिंदे वस्तीतील चांगदेव शिंदे यांच्या पुरबधित घराची पाहणी केली. या वस्तीचे पुनर्वसन करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांचेकडे बाधित वस्तीतील लोकांनी केली असता नक्कीच आपले पुनर्वसन करण्यात येईल याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना तात्पुरती  लवकरच मदत करण्यात येईल.तसेच पंचनामे करून मदत देण्यात येईल. अटी व निकष यामध्ये शिथिलता आणण्यात येईल. यामध्ये कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. मदतीपासून कोणीही वंचीत राहणार नाही. जमीन पूर्णता खरडून गेली आहे,याबाबत मदतीचे निकष बदलविण्यात येतील असेही सांगितले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की,बाधितांना आता मदतीची आवश्यकता असून प्रत्येकाने आपआपल्या परीने मदत करावी.नैसर्गिक आपत्ती कोसळली असून अशाप्रकारच्या संकटांना न घाबरता धीर धरावा.सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत.केंद्र आणि राज्य सरकारची मदत देऊन जनतेला आधार देण्यात येईल.पंचनाम्यानंतर नुकसानीची तीव्रता समोर आल्यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे बाधितांना आश्वस्त केले.

करंजा गावाचा भाग असलेल्या शिंदे वस्तीतील पोलीस पाटील बाळासाहेब चांगदेव शिंदे यांच्या घराचे पूर्णता नुकसान झाले असून एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री श्री.सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी त्यांच्या घरात जाऊन संसारोपयोगी साहित्याच्या नुकसानीची पाहणी केली.

तसेच जवळच्या करळेवस्तीला  एनडिआरएफच्या बोटीने जाऊन भेट दिली व बाधित वस्तीतील लोकांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली.त्यांना धीर देऊन मदतीची ग्वाही दिली.

Exit mobile version