Marathi e-Batmya

बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावरून विरोधक आक्रमकः नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित

पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकरी कर्ज यावरून सरकारच्या विरोधात आंदोलन केले. तर दुसरीकडे विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर पाच मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्याची पाळी आली.

दरम्यान, विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधकांनी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करण्यास सुरुवात केली. त्यावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यांनी विरोधकांना जागेवरुन बसा…अशी सूचना करण्यास सुरुवात केली. मात्र विरोधकांनी माफीच्या मुद्यावरून आक्रमक पवित्रा तसाच ठेवला. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नाना पटोले आणि गटनेते विजय वडेट्टीवार हे वेलमध्ये उतरत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आसनाकडे जाणाचा प्रयत्न करू लागले आणि अध्यक्षांच्या आसनावरील राडदंड काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना उद्देशून मला कारवाई करण्यास भाग पाडू नका असा इशारा दिला. परंतु विरोधकांकडून शेतकऱ्यांची माफी मागा… माफी मागा…माफी मागा… शेतकऱ्यांची माफी मागा, अशी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे एकप्रकारे सभागृहात दोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

दुसरीकडे विरोधक मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, यावर ठाम राहिले. यानंतर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीकडे जाणे हे योग्य नाही, त्यामुळे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र विरोधकांची आणि नाना पटोले यांची घोषणाबाजी आणि त्यांचे वर्तन यावरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंचे एका दिवसासाठी विधानसभा कामकाजातून निलंबित करण्यात आले. यानंतर विरोधक आणखीनच आक्रमक होत पुन्हा घोषणाबाजी सुरु केली. या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय…माफी मागा…माफी मागा शेतकऱ्यांची माफी मागा…अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

Exit mobile version