विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीचे वक्तव्य प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांनी करत अवमान केल्याचा मुद्दा उपस्थित करत अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचे सांगत इंद्रजीत सावंत यांना यावरून धमकाविल्याचा आरोप केला. अबु आझमी यांच्याबरोबरच प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली. मात्र सत्ताधाऱ्यांकडून याप्रकरणी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूर यांच्याविषयीचा मुद्दा उपस्थित करताना माईक बंद करण्याचा प्रयत्न करण्याता आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राज्य सरकार विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.अबू आझमी यांनी क्रूर बादशहा औरंगजेब याचे उदात्तीकरण होईल, असे वक्तव्य केले. प्रशांत कोरटकर यांनी इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली. राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा विकृतपणे इतिहास मांडला असल्याने या तिघांवर एकत्र कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, अबू आझमी यांचे विधानसभा सभागृहाचे सदस्यत्व रद्द करण्यात आले पाहिजे, अशा प्रकारे त्याने शिवाजी महाराजांच्या बाबत वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी अबू आझमी यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरीही त्याचीच पिलावळ प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात काहीही भूमिका घेतली नसल्याची जोरदार टीकाही केली.
शेवटी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, राहुल सोलापूरकर याने आमची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास विकृत पद्धतीने मांडला आहे. विकृत मानसिकता असलेल्या या गुन्हेगारावर कारवाई करण्याच्या ऐवजी पुणे महानगरपालिकेच्या वतीने सांस्कृतिक धोरण ठरवणाऱ्या सल्लागार समितीत घेऊन सन्मान करण्यात आला आहे. सदरील प्रकरण लक्षात घेता शासनच राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही यावेळी केला.
