मुंबईः प्रतिनिधी
देशात मोदी आणि राज्यात फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत विकासकामांचा डंका पिटत असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
निवडणुका जवळ आल्यावर केंद्र व राज्य सरकार मोठमोठया जाहिराती आणि विकासकामांची उद्घाटने करत विकास आम्हीच करत आहे असे सांगत असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक विकासकामे केली जात असल्याचा दावा केला आहे. पियुष गोयल हे मुंबईचे आहेत. पावसामध्ये रेल्वेची काय हालत झाली होती याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. पियुष गोयल महाराष्ट्रात ४० टक्के विकास होत असल्याचे बोलत आहेत. परंतु ट्वीटर, सोशल मिडिया यावरुन सरकार किंवा व्यवस्था चालवली जात नाही हे लक्षात घ्या असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला.
एकही नवीन योजना या सरकारची नाही. आमच्या सरकारने सुरु केलेल्या आणि अपुर्ण राहिलेल्या कामांच्या फित कापत आहेत आणि आमच्या कामांचे श्रेय घेतले जात असल्याचेही ते म्हणाले.
सत्तेसाठीच भास्करराव जाधव शिवसेनेत – मलिक
सत्तेची चटक लागल्यानेच भास्कर जाधव शिवसेनेत गेले आहेत परंतु त्यांचा येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा उमेदवार पराभव करून याचा बदला घेईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी यांनी दिला.
गुहागरचे आमदार भास्करराव जाधव यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
भास्कर जाधव हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. ते शिवसेनेत असताना त्यांचा राष्ट्रवादीच्या उमेदवारानेच पराभव केला होता. पराभव झाल्यावर ते राष्ट्रवादीत आले. त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले. विधानसभा देण्यात आली. मंत्री करण्यात आले. परंतु आता ते सत्तेसाठी शिवसेनेत गेल्याची टीका त्यांनी केली. येत्या निवडणुकीत त्यांच्यासमोर दमदार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस देईल आणि त्यांचा पराभव करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी – फडणवीस आम्ही केलेल्या कामांची उद्घाटने करत डंका पिटतायत
