Marathi e-Batmya

अखेर निष्ठावंताला डावलत राजघराण्यातील जावयाला भाजपाची उमेदवारी जाहीर

मुंबईः प्रतिनिधी
पार्टी विथ डिफरन्सचा नारा देत आपले वेगळेपण सिध्द करण्याच्या नादात भाजपाकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या धर्तीवर निष्ठांवतांना नारळ देण्याचा प्रकार सुरु केला आहे. याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजनदार राजघराण असलेल्या नेत्यांच्या जावयाला अर्थात राहुल नार्वेकर यांना राज पुरोहीत सारख्या निष्ठावंताला डावलत उमेदवारी आज अखेर जाहीर केली.
यासंदर्भातील वृत्त यापूर्वीच मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाने दिले होते. त्यात आज भाजपाने त्यावर शिक्कामोर्तब केल्याने हे वृत्त खरे ठरले.
मुंबईच्या राजकारणात विशेषतः मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि आमदार राज पुरोहीत यांच्यातील सवतासुभा जाहीर आहे. त्यातच मंगल प्रभात लोढा हे मुंबईच्या प्रदेशाध्यक्ष पदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपले विरोधक टिपायला सुरवात केली. त्यातच भाजपाकडून कुलाबा विधानसभा मतदार संघातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर तथा नार्वेकर यांचे सासरे हे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत राज पुरोहीत यांची उमेदवारीचा पत्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कट केला.
तसेच नार्वेकर यांना भाजपातूनच तिकिट देणे सोपे व्हावे आणि त्यांच्यामागे जनाधार निर्माण व्हावा यासाठी त्यांच्या आमदार फंडासाठी अतिरिक्त निधी म्हाडा, राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आला. याची साधी भणकही आमदार राज पुरोहीत यांना लागू दिली नाही.

 

Exit mobile version