Marathi e-Batmya

उध्दव ठाकरेंच्या राजीनाम्यावर १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड क्षमविण्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना अपयश आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांनी अखेर काल रात्री ९.३० वाजता आपण राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यानंतर तब्बल १२ तासानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वास्तविक पाहता पक्षप्रमुख ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया व्यक्त करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. तसेच एकनाथ शिंदे ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त करणार की एखादे निवेदन जारी करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर गोवा येथील विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

गोवा विमानतळावर एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, उध्दव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आपल्याला आनंद नसल्याचे सांगत वेळीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी लक्ष दिले असते तर ही वेळच आली नसती.

गोव्यात बंडखोर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीसंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून माझी निवड झाली आहे. सरकार स्थापनेसंदर्भातील पुढील प्रक्रियेसाठी सर्व ५० आमदारांनी मला अधिकार दिले आहेत. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. मी परत गोव्याला येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, त्याचा आम्हाला आनंद नाही. जी परिस्थिती उद्भवली होती त्यात सर्व ५० आमदारांची एकच मागणी होती. आमदारांना मतदारसंघात काही प्रश्न, अडचणी होत्या. वाईट अनुभव येत होते. तेव्हा आपण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाऊयात अशी सर्व ५० आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी होती. वेळीच निर्णय घेतला असता तर ही वेळ आली नसती. आम्हाला कोणालाही आनंद नाही. उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात कालही आदर होता आणि आजही आहे.

तसेच मुंबईला निघण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत, शिंदे गटासोबत भाजपाची चर्चा सुरु असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन केले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस असल्याचेही ट्विट केले असून भाजपासोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Exit mobile version