Marathi e-Batmya

रोहित पवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान, आरोप सिद्ध करून दाखवा…

मागील सहा महिन्याहून अधिक काळ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. या मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका लोकसभा निवडणूकीत सत्ताधारी भाजपासह महायुतीत असलेल्या पक्षांना चांगलाच बसला. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजपा आणि महायुतीच्या उमेदवारांना पाडणार असल्याची घोषणा केली. तसेच वेळप्रसंगी मराठा आंदोलकांकडून स्वतंत्र उमेदवार भाजपा आणि विरोध करणाऱ्या ओबीसी आमदारांच्या विरोधात उमेदवार करणार असल्याची घोषणा केली. त्यातच राज्यातील विधानसभेची आचारसंहिता कधीही जाहिर होवू शकते अशी परिस्थिती आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे आणि रोहित पवार असल्याचा आरोप केला. छगन भुजबळ यांनी केलेल्या आरोपाला रोहित पवार यांनी एक्सवर ट्विट करत प्रत्युत्तर दिले.

रोहित पवार आपल्या ट्विटद्वारे छगन भुजबळ यांच्यावर पलटवार करताना म्हणाले की, सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्या सारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर २ सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असा सवालही केला.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपाला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे साहेबांवर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृह मंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, असे प्रतिआव्हानही यावेळी छगन भुजबळ यांना दिले.

शेवटी आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, असो! हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे दोन समाजात भांडणे लावण्याचा उचललेला विडा खाली ठेवा आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने नांदू द्या तसेच भाजपा नेत्यांच्या नादाला लागून महाराष्ट्राची वाट लावण्यापेक्षा जनतेच्या खऱ्या समस्यांकडे लक्ष द्या, अशी विनंतीही केली.

Exit mobile version