Marathi e-Batmya

संभाजीराजे यांचा सवाल, समुद्रात शिवस्मारक होणार नसेल तर जाहिर करा

स्वराज्य पक्षाचे संस्थापक तथा भाजपा पुरस्कृत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज शोध शिवस्मारकाचा अभियानातंर्गत दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनाची भूमिका घेत काही काळ पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी आम्ही काही आंदोलन करण्यासाठी आलेलो नाही. त्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करू नये असे आवाहन संभाजी राजे यांनी करत फक्त आम्ही अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक कुठे आहे याचा शोध घेण्यासाठी आलो असल्याचे सांगत आम्हाला स्मारकाचा शोध घ्यायचा असल्याचे सांगितले.

यावेळी गेट वे जवळ जमा झालेल्या मराठा समाजाच्या समर्थक आणि स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना संभाजीराजे म्हणाले की, राज्य सरकारने अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारणी संदर्भात मोठ्या थाटात घोषणा केली होती. त्यासाठी कोट्यावधी रूपयांचा निधीही मंजूरही केला होता. तर समुद्रातील पाण्याचे पूजनही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. असे असतानाही शिवस्मारक अरबी समुद्रात का उभारण्यात आले नाही असा सवाल राज्य सरकारला करत या शिवस्मारकासाठी तरतूद केलेल्या निधीचा वापर राज्यातील ग़ड-किल्ल्यांवर किती खर्च केला असा सवालही यावेळी केला.

पुढे बोलताना संभाजीराजे म्हणाले की, अरबी समुद्रातील स्मारक कधी होणार आहे याबाबत राज्य सरकारने अद्याप तरी जाहिर केले नाही. त्यामुळे अरबी समुद्रातील स्मारक राज्य सरकारकडून उभारले जाणार आहे का की नाही होणार याविषयीची माहिती राज्य सरकारनेच जाहिररित्या सांगावे अशी मागणीही यावेळी केली.

यावेळी संभाजी राजे यांनी त्यांच्या पक्षाच्या निवडक ५० कार्यकर्त्यांच्या टीमला सोबत घेऊन समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेल्या शिवस्मारकाच्या परिसराजवळ जात समुद्रातील जागेची पाहणी केली. तसेच समुद्रातील त्या जागेचे ठिकाणाची पाहणीही यावेळी केले.

यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाऊ नये यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात लढू आणि शिवस्मारकासाठी परवानगी मिळवू असे सांगितले.

दरम्यान, स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे हे भाजप पुरस्कृत म्हणून संसदेत खासदार म्हणून असताना कधीही शिवस्मारकाच्या उभारणीचा मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र दुसऱ्या टर्मला संभाजी राजे यांच्या राज्यसभेच्या खासदारकीला भाजपाने पुन्हा पाठिंबा दिला नाही. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील महाविकास आघाडीकडे पाठिंब्याची मागणी भाजपाने संभाजी राजे यांना करायला लावली. मात्र त्यानंतरही संभाजी राजे यांची खासदारकीला वर्णी लागली नाही. त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या तापलेला असताना संभाजी राजे यांनी मध्येच शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करण्यामागे भाजपाचा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून नवा मुद्दा चर्चेत आणण्याची खेळी असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

Exit mobile version