Marathi e-Batmya

मोदींनी पवार कुटुंबाची काळजी करू नये

कोल्हापूरः प्रतिनिधी
पक्षावर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांचे पुतणे अजित पवार यांनी हिट विकेट काढल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. मोदी यांच्या गौप्यस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य करताना शरद पवार यांनी मोदींनी माझ्या कुटुंबियांची चिंता करू नये असा इशारा देत माझ्या आईचे माझ्यावर संस्कार असून माझी आई कोल्हापूरची असल्याचा सूचक टोला पंतप्रधान मोदी यांना लगावला.
कोल्हापूरात आयोजित करण्यात आलेल्या महाआघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणा एकाचा नसून तो जनतेचा पक्ष असल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली. तसेच अजित पवार हे उत्तम काम करत असून ते चांगले प्रशासकही असल्याचे प्रशस्तीपत्रक त्यांनी अजित पवारांना दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोठेही गेले तरी गांधी कुटुंबियावर टीका करत असतात. मात्र दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवून फक्त इतिहासच नाहीतर भूगोलही घडविल्याची आठवण करून देत पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या खोट्या प्रचारावर टीका केली.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी देश सोडला नाही. त्या इथेच रहात देशाबरोबर असलेली बांधीलकी जपल्याचे सांगत गांधी कुटुंबियांची स्तुती केली.
देशात सत्तेत आल्यापासून मोदींनी फक्त हिंदू-हिंदूचा धोषा लावला. परंतु या देशाच्या जडणघडणीत सर्वच जातीय-धर्मिय लोकांचे योगदान आहे. त्यामुळे पंतप्रधान पदाची जी शपथ घेतली, त्या शपथेचा द्रोह केल्याचा आरोप करत असा द्रोह करणाऱ्या व्यक्तीला पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याची टीका त्यांनी केली.

Exit mobile version