Marathi e-Batmya

शशिकांत शिंदे यांची मागणी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांना पंचनामे न करता मदत जाहीर करावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.

शशिकांत शिंदे म्हणाले की, “गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाने थैमान घातले आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे बळीराजाच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. बळीराजाने मोठया आशेने शेतात पीक पिकवले होते. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.” तसेच शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. आता तरी राज्य सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार का? असा सवाल सरकारला उद्देशून केला.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे यांनी मागणी केली की, गेल्या दोन ते तीन दिवसांत पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात. पण, राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे. कोकणात धान, मराठवाड्यात सोयाबीन, विदर्भात सोयाबीन, कपाशी, ज्वारी, धान अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाने सोयाबीन, कपाशी, धान इत्यादी पिकांना मोठा फटका बसला असून, शेतकरी कधी नव्हे इतका अडचणीत आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, लातूर, उस्मानाबाद, बीड, जालना, तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, जालना, नांदेडमध्ये सोयाबीन पिकांना कोंब फुटली आहेत. अनेक तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. आता तरी सरकारने जाग व्हावं तसेच शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी केली.

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मे महिन्यापासून राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातलेला आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या भागात मोठ्या प्रमाणात पावसामुळे बळीराजाचे नुकसान झालेल आहे. शेतकऱ्यांचं खरीप हंगामातील पिकाच प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे बळीराजा दुखावलेला आहे. विधिमंडळात राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनामाचा कुठलाही निर्णय घेतलेला नाही. बळीराजांच्या संदर्भात महायुतीचे सरकार गांभीर्याचे नसल्याचे हे यावरून दिसून येत आहे. सरकारचे नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने यावर राज्य सरकारच लक्ष शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रश्न उचलून निदर्शनास आणून दिले होते. यावर संबंधित मंत्र्यांकडून निकषावर बसत नसल्याचे सांगून टाळलं, खरं म्हटलं तर राज्य सरकारकडे पैसे नाहीत त्यामुळे सरकार आता शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेत नाही चुकीची कामे घेऊन सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारलेला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडे पैसे नाही हे सरकार बळीराजाच नसून उद्योगपतींचे आहे का?असा सवालही यावेळी उपस्थित केला.

Exit mobile version