राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी किंवा मतभेद नसून पक्षाचे सर्व निर्णय सामूहिक चर्चेने व एकमताने घेतले जातात, असा दावा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे स्पष्ट करत, “मी प्रॅक्टिकल राजकारणी आहे. मला रणनीतीकार किंवा सर्व्हेची गरज नाही,” असे ठामपणे सांगितले.
प्रशांत किशोर यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची सुमारे सहा तास भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. काही वृत्तवाहिन्यांनी या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना बदलण्याचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त प्रसारित केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना सुनिल तटकरे म्हणाले, ती केवळ सदिच्छा भेट होती. एखादी भेट झाली म्हणजे लगेच त्यांची पक्षाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली, असा अर्थ काढणे योग्य नाही. अशी नियुक्ती झाली असती तर त्याची माहिती मला निश्चितच असती. तसेच प्रदेशाध्यक्ष पदावरून आपल्याला हटवण्याबाबत मीच कसे उत्तर देणार? असे म्हणत त्यांनी यावर बोलणे टाळले.
दरम्यान आपल्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत सुनिल तटकरे म्हणाले, मी शरद पवार, अजित पवार आणि इतर वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही निवडणुकीचा सर्व्हे केला नाही. मी प्रत्यक्ष मैदानात काम करणारा कार्यकर्ता आहे. गावागावातील लोक, शेतकरी, तरुण आणि उद्योजक यांना भेटल्यानंतर जनतेचा कल सहज समजतो. मी आठ वेळा संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला असून राज्याचा कानाकोपरा मला माहिती आहे असेही यावेळी सांगितले.
दरम्यान २०१९ च्या निवडणुकीतील यशाचा दाखला देत सुनिल तटकरे यांनी सांगितले की, ते यश कोणत्याही रणनीतीकारामुळे किंवा सर्व्हेमुळे मिळाले नव्हते, तर कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे मिळाले होते. सर्व्हे करणे चुकीचे नाही; मात्र अंतिम निर्णय हा राजकीय अनुभव आणि जनतेच्या थेट प्रतिसादावरच आधारित असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद तळागाळातील संघटन आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीत असल्याचे सांगत पक्षात कोणतीही अंतर्गत गटबाजी नसल्याचा पुनरुच्चार केला.
