Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकार कोणाचेही असो,शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही अतिशय दुर्दैवी बाब

सरकार कोणाचेही असो,शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आपल्या अन्नधान्याची गरज भागवणाऱ्या बळीराजावर आत्महत्येची वेळ येऊ नये, यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत,असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.

सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की,राज्यात मोठा दुष्काळ आहे. आदरणीय शरद पवार साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना याविषयी दोन पत्रं दिली आहेत. आमची सरकारला सहकार्याची भूमिका आहे. आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच बरोबर पाणी वाटप योग्य झालं पाहिजे. मुलांच्या शाळा,महाविद्यालयाचे शुल्क माफ झाले पाहिजे. ही राजकारण करण्याची वेळ नाही.आम्ही हेक्टरी एक लाख रुपये देण्यासाठी मागणी केली आहे. सरकारने अतिशय संवेदनशीलपणे वागावं, असे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,शेतकरी आत्महत्या आमच्या किंवा त्यांच्या काळात झाल्या त्यावर त्यांनी आरोप केले, त्यावर मी आता त्यांच्यावर बोलणार नाही. काल मी बारामती लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला, जे शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यावर कलेक्टरनेही सांगितल आहे ,की जो कोणी शेतकरी तुमच्या निदर्शनास येईल त्यांना तातडीने मदत केली जाईल, असेही सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की,माझ्यासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच आदरणीय आणि वंदनीय आहेत. ठाकरे आणि पवार कुटुंबांचे ऋणानुबंध पाच दशकांहून अधिक काळाचे असून ते दोन्ही बाजूंनी जपले गेले आहेत. राजकारणातील घडामोडींचा या कौटुंबिक ऋणानुबंधांशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळावा, यासाठी राजकारण कधीतरी बाजूला ठेवून सरकारने उसाच्या दराच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे,असेही सांगितले.

Exit mobile version