Marathi e-Batmya

उदय सामंत यांचा दावा; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ, भाजपाचा दुजोरा नाही

महायुतीत दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवरून रस्सीखेच सुरु झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गृह मंत्री पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रही राहिले. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेवर भाजपाचे नेते मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार या दोघांचेच नाव छापण्यात आले. त्यामुळे आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी समारंभात एकनाथ शिंदे हे सहभागी होणार नसल्याचे या आधीच स्पष्ट झाले.

परंतु एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती. तसेच काल राजभवनावर सत्ता स्थापनेचा महायुतीच्या नेत्यांनी दावा केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना सत्तेत सहभागी होण्याची विनंती केली होती. त्यावर संध्याकाळपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले. मात्र रात्री उशीरापर्यंत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चेत तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे शपथविधीच्या मुख्य सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून तशा निमंत्रण पत्रिकाही छापण्यात.

परंतु त्यात एकनाथ शिंदें यांचे नाव छापण्यात आले नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या समर्ख आमदारांना त्यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ सहभागावरून संशय निर्माण झाला. तसेच राजकिय भवितव्य अंधःकारात जाते की काय असा सवाल निर्माण झाला. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत, भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत काळजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून जर कोणी सरकार स्थापन करत असेल किंवा आमच्यावर मंत्री पदाची जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न केला तर ती जबाबदारी आम्ही स्विकारणार नाही असे सांगत शिंदे यांना डावलून कोणी काही करत असेल तर आम्ही ते होवू देणार नाही असा इशारा दिला.

त्यानंतर उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांची शिफारस करण्यात येत असल्याचे पत्र घेत ते राजभवनावर जात राजभवनाचे अतिरिक्त सचिव प्रविण दराडे यांच्या हाती सुपूर्ण केले. त्यानंतर या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगत त्यासंदर्भातील पत्र देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहितीही यावेळी दिली.

Exit mobile version