मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील ७ हजार कोटींच्या मिसिंग लिंकला अवघ्या दोन महिन्यात खड्डे पडले, त्याचा धबधबा झाला व वाहतूक बंद करावी लागली, हा निकृष्ट कामाचा प्रकार आहे. एखाद्या प्रकाल्पावर प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना ‘भाडे के तट्टू’ कसे काय म्हणतात? सरकारला प्रश्न म्हणजे महाराष्ट्राची बदनामी कशी होते? प्रश्न विचारणाऱ्यांना सोडणार नाही, अशी मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेतून धमकी देतात, हे लोकशाहीचे नाही तर हुकूमशाहीचे लक्षण आहे, असा घणाघाती हल्ला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेतील विधान अत्यंत आक्षेपार्ह व निषेधार्ह आहे. माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा. मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होतो व जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो हा जनतेचा पैसा खड्ड्यात घालवणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे. प्रकल्पावरील खर्च हा जनतेचा पैसा आहे भाजपा वा फडणवीस यांच्या खिशातील नाही. जनतेच्या जीवाशी खेळाल तर जाब विचारलाच जाणार, त्याची एवढी मिरची लागण्याची गरज काय. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारे आहे. महाराष्ट्राची बदनामी निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचारामुळे, सत्ताधाऱ्यांमुळे व कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या अशी मागणीही यावेळी केली.
लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही!
हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे!
माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या… pic.twitter.com/y5MGqmpdGt
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) July 8, 2026
वर्षा गायकवाड शेवटी म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसेच विरोधकांची बदनामी करण्यासाठी मीडिया व सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च केले, हे करताना भाजपाला काहीच वाटत नाही पण भाजपा सरकारच्या कामावर प्रश्न विचारल्यावरच बदनामी कशी होते. दुसऱ्यांना भाड्याचे तट्टू म्हणाणाऱ्या देवेंद्र फडणविसांनी भाजपाने असे किती भाड्याचे तट्टू ठेवले आहेत, याची माहिती घ्यावी. भाजपाने आजपर्यंत ‘जे पेरले तेच उगवले’, असा टोलाही लागावला .
