Marathi e-Batmya

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, देशात लॉकडाऊन सारखी स्थिती…

देशातील जनता महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ आणि आर्थिक अस्थिरतेने होरपळत असताना भाजपा सरकार मात्र धार्मिक ध्रुवीकरण, इव्हेंटबाजी आणि भावनिक मुद्द्यांच्या आड आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

इंधन तुटवडा आणि वाढत्या दरांवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवत विजय वडेट्टीवार म्हणाले, वाहनाचे आरसी बुक बघून डिझेल दिले जात आहे. शेतकरी आता शेतीच्या कामासाठी डिझेल वापरतात ना? देशातील स्थिती येत्या काही दिवसात लॉकडाऊन सारखी होऊ शकते. पुढील काही दिवसात पेट्रोल १७० रुपये आणि डिझेल १५० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी आणि सामान्य नागरिक पूर्णपणे भरडले जातील. आताच विमानांच्या फेऱ्या कमी होत आहेत, इंधनाचा तुटवडा वाढत आहे. सरकारने देशाला आर्थिक खड्ड्यात ढकलण्याचे काम सुरू केले असल्याची टीका केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजपाचे संपूर्ण राजकारण जनतेच्या याच मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी सुरू आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या या गंभीर मुद्द्यांवर बोलण्याऐवजी सत्ताधारी हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करून समाजात तेढ पसरवत आहेत, असल्याचा आरोपही यावेळी केला.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले, सरकार एकीकडे संविधानाची भाषा करते पण प्रत्यक्षात समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत. मंत्री आपल्या शपथेचा विसर पडल्यासारखे असंवेदनशील विधान करत आहेत. जनतेचे लक्ष आर्थिक संकटावरून हटवण्यासाठी सरकार धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी बोलताना केला.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारवर निशाणा साधताना शेवटी विजय वडेट्टीवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत, पण सरकार केवळ आश्वासनांची धूळफेक करत आहे. जीआर काढले जातात, मात्र अंमलबजावणी होत नाही. सरकारकडे जनतेला देण्यासाठी काहीही उरलेले नाही, अशी टीका केली.

Exit mobile version