Marathi e-Batmya

मंत्री नरहरी झिरवाळ यांचा उद्या रात्रीपर्यंत राजीनामा ?

राज्यातील महायुती सरकार मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमुळे अडचणीत येत असून महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भोंदूबाबा अशोक खरातमुळे अडचणीत आलेला असतानाच पुन्हा दुसऱ्यांदा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुती सरकार पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.

काही दिवसांपूर्वी नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील केबिनमधून त्यांच्याकडे क्लार्कला लाच स्विकारताना अटक करण्यात आली. त्यावेळी नरहरी झिरवाळ यांना अध्यात ना मध्यात असतात म्हणून मंत्री पदाचे जीवदान देण्यात आले. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीय व्यक्तीसोबतचा बेडरूममधील एका व्हिडिओ व्हायरल झाला. विशेष म्हणजे अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सदरचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे व्हिडिओचे पडसाद विधिमंडळात उमटले नाहीत. पण राष्ट्रवादी पक्षाच्या स्तरावर आणि सरकार पातळीवर उमटले आहेत. त्यातच या प्रकरणावरून विरोधकांकडूनही नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव आणण्यात येत आहे.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी रूपाली चाकणकर यांच्या पाठोपाठ आता नरहरी झिरवाळ यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्या शनिवारी रात्रीपर्यंत नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान नरहरी झिरवाळ प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की, विरोधी पक्ष त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव आणत आहे, परंतु सरकार सखोल चौकशीनंतरच पुढील कारवाई करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि सत्य समोर आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल. तसेच नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि दावा केला की, संबंधित व्हिडिओ हा तीन-चार वेगवेगळ्या व्हिडिओंना एकत्र करून तयार केलेला (मॉर्फ केलेला) व्हिडिओ आहे. त्यांनी नरहरी झिरवाळ यांना तात्काळ अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला, जेणेकरून व्हिडिओची सत्यता पडताळता येईल. व्हिडिओमागील सत्य निश्चित करण्यासाठी सखोल चौकशी केली जाईल. सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व बाबींचा विचार केला जाईल आणि संबंधित पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याशी सल्लामसलत करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी समोर आलेल्या व्हिडिओला गंभीर म्हटले असून, त्याची सत्यता पडताळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तपासात व्हिडिओ खरा असल्याचे निष्पन्न झाल्यास, त्यात सामील असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले की, केवळ एखाद्या व्यक्तीसोबत असलेल्या फोटो किंवा व्हिडिओच्या आधारे कोणताही निष्कर्ष काढणे योग्य नाही. कोणत्याही प्रकरणात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तथ्यांची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसलाही या प्रकरणात कोणतीही घाईची पावले उचलायची नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सखोल चौकशीनंतरच निर्णय घेण्याचे ठरवले आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका कथित व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, झिरवाल यांचे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत प्रेमसंबंध आहेत. हा व्हिडिओ सरकारी निवासस्थानात चित्रित करण्यात आला असून त्यात ब्लॅकमेलिंग किंवा गैरवर्तनाचा समावेश असू शकतो, असेही आरोप आहेत. या प्रकरणामुळे अजित पवार गटासमोर एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. सध्या चौकशी सुरू असून, विरोधी पक्ष सातत्याने दबाव टाकत आहे.

Exit mobile version