Marathi e-Batmya

अखेर मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी आणि शशी थरूर यांच्यात झाली चर्चा

काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी गुरुवारी संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. त्यांनी पक्षातील मतभेदांच्या अटकळांना फेटाळून लावत या भेटीला एक नियमित भेट म्हटले.

भेटीपूर्वी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शशी थरूर यांनी या चर्चांना महत्त्व दिले नाही. “मी आता संसदेत जाणार आहे. जेव्हा भेट होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. माझ्या स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला भेटण्यात इतके असामान्य काय आहे?” असा प्रश्नार्थक सवालही यावेळी केला.

वृत्तानुसार, संसद भवन संकुलातील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या दालनात ही बैठक एक तासाहून अधिक काळ चालली. बुधवारी संसदेचे नवीन अधिवेशन सुरू झाल्यामुळे शशी थरूर यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे या दोघांशीही चर्चा केली. सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे देखील या बैठकीला उपस्थित होते.

‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) शशी थरूर यांनी या भेटीचा एक फोटो शेअर केला आणि सांगितले की, त्यांच्यात आणि काँग्रेस नेतृत्वात सर्व काही ठीक आहे.

तसेच एक्सवर शशी थरूर म्हणाले की, “काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे विविध विषयांवर आज झालेल्या सौहार्दपूर्ण आणि विधायक चर्चेबद्दल आभार. भारताच्या जनतेच्या सेवेसाठी पुढे जात असताना आम्ही सर्वजण एकाच मताचे आहोत,” असे पोस्ट केले.

तिरुवनंतपुरमच्या खासदार शशी थरूर आणि काँग्रेस नेतृत्वाच्या काही गटांमध्ये अस्वस्थता असल्याचे सूचित करणाऱ्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. शशी थरूर यांनी सांगितले आहे की, अधिवेशनादरम्यान आपली मते नोंदवण्यासाठी ते पक्षाच्या नेतृत्वाशी ‘थेट’ बोलणार आहेत.

शशी थरूर काँग्रेस बाहेरचे पर्याय शोधत असल्याच्या अफवा तेव्हा समोर आल्या, जेव्हा काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की, त्यांना राज्यातील नेत्यांकडून बाजूला सारले जात आहे आणि कोची येथील एका कार्यक्रमात राहुल गांधींनी कथितरित्या त्यांची दखल न घेतल्याने ते नाराज आहेत.

काल,शशी थरूर यांनी पक्षात ‘काही समस्या’ असल्याचे मान्य केले, परंतु त्यांनी आग्रह धरला की, त्यांनी संसदेत संघटनेच्या अधिकृत भूमिकांपासून कधीही फारकत घेतलेली नाही. त्यांनी अधोरेखित केले की, अंतर्गत मतभेद सार्वजनिकपणे नव्हे, तर पक्षाच्या आतच चर्चेने सोडवले पाहिजेत.

शशी थरूर पुढे म्हणाले की, “मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, काही समस्या आहेत ज्या मला माझ्या पक्षाच्या नेतृत्वाकडे मांडायच्या आहेत, सार्वजनिक मंचावर नाही. मी संसदेसाठी दिल्लीला जाणार आहे आणि तिथे मला माझ्या चिंता स्पष्ट करण्याची आणि त्यांचे मत ऐकण्याची संधी मिळेल,”. १७ वर्षांपासून काँग्रेसचे नेते असलेल्या शशी थरूर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, “आपण फार पुढे जाऊ नये. जे काही चुकीचे घडले आहे, त्यावर लक्ष देण्याची गरज आहे आणि योग्य व्यासपीठावर त्यावर निश्चितपणे लक्ष दिले जाईल.”

याव्यतिरिक्त, केरळ साहित्य महोत्सवात बोलताना शशी थरूर यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वरील आपल्या भूमिकेचे समर्थन केले आणि आपण आपल्या मतावर ठाम असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आपण एक स्तंभ लिहिला होता, ज्यात हा हल्ला शिक्षा न होता सुटता कामा नये आणि त्याला ठोस प्रत्युत्तर देण्याची गरज आहे, असा युक्तिवाद केला होता, अशी आठवण करून दिली.

शेवटी बोलताना शशी थरूर म्हणाले की, “जेव्हा मी स्वतःच त्याची शिफारस केली होती, तेव्हा माझ्याकडून त्याची टीका करण्याची अपेक्षा कशी केली जाऊ शकते? मी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान आणि त्यानंतरही त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला होता,” असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version