Marathi e-Batmya

१२ वर्षे सत्तेत असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी आरक्षण विधेयकप्रश्नी काँग्रेसला जबाबदार ठरवले

संसदेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील “माता आणि मुलींची” माफी मागितली. तसेच, विरोधकांच्या “क्षुद्र राजकारणामुळे” महिलांच्या हक्कांची “गर्भहत्या (भ्रूणहत्या)” होत असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. देशाला उद्देशून केलेल्या ३० मिनिटांच्या भाषणात, आक्रमक पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की, लोकसभेत विधेयक अयशस्वी झाल्यानंतर विरोधकांनी, विशेषतः काँग्रेस, टीएमसी आणि डीएमके यांचा उल्लेख करत, जल्लोषात टेबलांवर थाप मारली होती.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, हे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल मी देशातील सर्व महिलांची माफी मागतो. काँग्रेस, डीएमके, टीएमसी आणि समाजवादी पक्षासारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणामुळे देशातील महिलांना त्रास सहन करावा लागला आहे. विशेष म्हणजे, बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये, जिथे टीएमसी आणि डीएमके सत्तेत आहेत, पुढील आठवड्यात निवडणुका होत आहेत.

तसेच संसदेत महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या उद्देशाने आणलेले संविधान (१३१ वी दुरुस्ती) विधेयक शुक्रवारी फेटाळण्यात आले. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून मोदी सरकारचा हा पहिला मोठा कायदेशीर पराभव आहे.
तथापि, हे लक्षात घेतले पाहिजे की, गुरुवारी रात्री अधिसूचित करण्यात आलेला २०२३ चा महिला आरक्षण कायदा अजूनही कायम आहे.
भावना आणि आक्रमक सूर यांची सरमिसळ करत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना इशारा दिला की, एक महिला कदाचित सर्व काही विसरेल, पण तिचा अपमान नाही.

पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, संसदेत जे घडले ते केवळ बाक आपटणे नव्हते, तर महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि आत्मसन्मानावर केलेला हल्ला होता. संसदेतील काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे वर्तन देशभरातील महिलांच्या मनात कायम राहील, असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

विरोधकांना इशारा देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसदेत “उत्सव साजरा करणाऱ्या” विरोधी नेत्यांना महिला “शिक्षा” देतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, या देशातील महिला, जेव्हा कधी आपल्या परिसरात या नेत्यांना भेटतील, तेव्हा त्यांना आठवण राहील. त्यांना आठवण राहील की, जेव्हा महिला आरक्षणाची आशा मावळली होती, तेव्हा याच व्यक्तींनी संसदेच्या सभागृहांमध्ये जल्लोष आणि आनंद साजरा केला होता, असे सांगितले.

विरोधी पक्षांचा मुख्य आरोप हा होता की, सरकार देशाचा निवडणूक नकाशा बदलून भाजपाला मदत करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा पुढे रेटण्याकरिता महिला आरक्षणाच्या मुद्द्याचा वापर करत आहे. विरोधी पक्षांनी यावरही जोर दिला की, याचा लोकसभेतील दक्षिण भारतीय राज्यांच्या प्रतिनिधित्वावर प्रतिकूल परिणाम होईल.

प्रत्येक राज्यातील संसदीय जागांच्या संख्येत ५०% प्रमाणात वाढ करण्यासंबंधीच्या तरतुदींचा समावेश करण्यास सरकार तयार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी यावरही जोर दिला की, या कायद्याचे संपूर्ण श्रेय ते स्वतःकडे घेण्यास तयार आहेत.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, प्रत्येक राज्याला अधिक आवाज देण्याचा हा प्रयत्न होता… राज्ये लहान असोत वा मोठी, त्यांची लोकसंख्या जास्त असो वा कमी. पण काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी संपूर्ण देशासमोर या प्रामाणिक प्रयत्नाचा गर्भहत्या केली, असा गंभीर आरोपही यावेळी केला.

पंतप्रधान मोदी यांनी मतदारसंघ पुनर्रचनेबाबत विरोधक ‘खोटे बोलत’ असल्याचा आरोपही केला.

पंतप्रधान मोदी यांनी आरोप केला की, या बहाण्याने त्यांना फाळणीच्या आगीत तेल ओतायचे आहे. काँग्रेसने ब्रिटिशांकडून ‘फोडा आणि राज्य करा’ हे राजकारण वारसा म्हणून घेतले असल्याची टीकाही यावेळी केली.

‘सुधारणा-विरोधी पक्ष’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या काँग्रेसवर विशेष लक्ष केंद्रित करत पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले की, विलंब करणे, दिशाभूल करणे आणि अडथळे आणणे हेच काँग्रेसचे तत्व राहिले आहे. काँग्रेसने सीमावाद प्रलंबित ठेवले. पाकिस्तानसोबतच्या पाणीवाटपाशी संबंधित मुद्द्यांना विलंब लावला. ओबीसी आरक्षणावरील निर्णय ४० वर्षे प्रलंबित ठेवला, असल्याचा आरोपही यावेळी केला.

भाषणाच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी यावर जोर दिला की, घटनादुरुस्ती विधेयके मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेले लोकसभेतील दोन-तृतीयांश बहुमत नसणे म्हणजे भाजपाचा पराभव झाला आहे असे नाही. मला विश्वास आहे की आम्हाला देशभरातील महिलांचा पाठिंबा आहे. मी देशातील प्रत्येक महिलेला आश्वासन देतो की आम्ही महिला आरक्षणाच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करू, असे म्हणत पंतप्रधानांनी वेगळ्या स्वरूपातील एक नवीन दुरुस्ती विधेयक लवकरच आणले जाण्याची शक्यता बोलून दाखविली.

Exit mobile version