Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचा निर्धार, ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टीकू शकणार नाहीत

ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून टिकू शकणार नाहीत आणि त्यांच्याकडे असे पुरेसे पुरावे आहेत ज्याद्वारे हे सुनिश्चित केले जाऊ शकते की, “हे गृहस्थ पदावर कायम राहणार नाहीत.” मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित ‘सार्वजनिक महाभियोग’ (public impeachment) कार्यक्रमात विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत होते. त्यावेळी राहुल गांधी यांनी वरील आरोप केला.

यापूर्वी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव मांडला. मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित या प्रतिकात्मक ‘महाभियोग’ कार्यक्रमाला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, विरोधी पक्षांचे इतर खासदार आणि नागरी समाजातील सदस्य उपस्थित होते.

दिल्लीत आयोजित या प्रतिकात्मक महाभियोग कार्यक्रमादरम्यान, शनिवारी राहुल गांधी म्हणाले की, ज्ञानेश कुमार भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून टिकू शकणार नाहीत. आमच्याकडे असे पुरेसे पुरावे आहेत ज्याद्वारे हे सुनिश्चित करता येईल की, हे गृहस्थ पदावर कायम राहणार नाहीत. आम्ही जी माहिती उघड करू, त्यानंतरही जर भाजपने त्यांना पदावर कायम ठेवण्याचा आग्रह धरला, तर भाजपचा खरा खेळ सर्वांसमोर स्पष्ट होईल असा इशाराही यावेळी दिला.

या सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमाला एक “राजकीय शस्त्र” असे संबोधत, राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांवर लोकशाहीचे नुकसान केल्याचा आरोप केला. राहुल गांधी पुढे म्हणाले की, तुम्ही निवडणुकांमध्ये फेरफार (rigging) करण्यापर्यंत मजल मारली आहे. कदाचित मोदी आणि शाह यात सर्वात वरच्या स्थानी असतील. आम्ही त्यांच्याशी निपटून घेऊ. पण तुम्ही त्यांचे एक साधन (tool) आहात.

राहुल गांधी यांनी इशारा दिला की, विरोधी पक्ष दुसऱ्या दिवशी दिल्लीच्या रस्त्यावर उतरून निषेध नोंदवेल. मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे संरक्षण (immunity) त्यांना उत्तरदायित्वापासून वाचवू शकणार नाही. तुम्ही निवडणुकांमध्ये फेरफार करणे सुरू ठेवू शकता. तुम्ही सीबीआय (CBI) आणि ईडी (ED) चा गैरवापर होऊ देणे सुरू ठेवू शकता. पण आम्ही तुम्हाला खात्री देतो की, हे तात्पुरते आहे. भारताची तरुण पिढी तुम्हाला माफ करणार नाही असेही यावेळी सांगितले.

दिल्लीत, ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आयोजित एका प्रतिकात्मक सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमादरम्यान, त्यांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव संमत केला. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आपला निषेध नोंदवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिल्लीत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी आयोजित ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या ‘मॉक पार्लमेंट’ला (प्रतिकात्मक संसद) एक सन्मानजनक आणि रचनात्मक चर्चा असे संबोधले. ही चर्चा भारतीय लोकशाहीच्या रक्षणासाठी असलेल्या दृढ वचनबद्धतेचे प्रतीक असल्याचे सांगितले. या बैठकीनंतर शशी थरूर म्हणाले की, हीच भावना उद्या रामलीला मैदानावर होणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या महा-रॅलीमध्येही दिसून येईल, ज्यामध्ये लाखो लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार धर्मेंद्र यादव यांनी सांगितले की, मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीने राबवलेला प्रतिकात्मक महाभियोगाचा कार्यक्रम हा संसदीय प्रतिष्ठा जपण्याच्या उद्देशाने होता. त्यांनी आरोप केला की, वारंवार नोटीस देऊनही विरोधी पक्षांना संसदेत या विषयावर चर्चा करण्याची संधी नाकारण्यात आली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीने आयोजित केलेल्या या प्रतिकात्मक सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमात, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की, मतदारांची नावे वगळल्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची वैधता धोक्यात आली आहे.

राहुल गांधी यांनी दावा केला की, १३.३ कोटी मतदारांची, म्हणजेच भारतातील एकूण मतदारसंख्येच्या सुमारे १५% मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, विरोधी पक्ष आणि विजयी उमेदवार यांच्यातील मतांचे अंतर सुमारे ३% इतके होते, त्यामुळे ही नावे वगळल्याच्या प्रकारामुळे निवडणुकीच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राहुल गांधी म्हणाले, निवडणूक आयोग स्वतःच असे सूचित करत आहे की २०२४ ची लोकसभा निवडणूक बेकायदेशीर होती आणि जे लोक, म्हणजेच भाजपचे लोक लोकसभेत निवडून आले आहेत, ते बेकायदेशीरपणे आले आहेत.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील या प्रतिकात्मक महाभियोगादरम्यान बोलताना, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नमूद केले की, संपूर्ण विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बागेत बसून मुख्य निवडणूक आयुक्तांवरील महाभियोगावर चर्चा करत आहे, कारण त्यांच्यासाठी इतर सर्व संस्थात्मक मार्ग बंद करण्यात आले आहेत.

शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील या सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमात मेहबूबा मुफ्ती यांनीही आपले मत मांडले. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “तो (ज्ञानेश कुमार) केवळ एक प्यादा आहे; त्याच्या मागे जे खरे सूत्रधार आहेत, त्यांनाही सत्तेतून हटवणे आवश्यक असल्याची मागणी केली.

या सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमात कार्यकर्त्या नेहा बोरा यांनीही सहभाग घेतला. त्यांनी असा दावा केला की, ‘फॉर्म-६’ (Form-6) मध्ये केलेले बदल हा ज्ञानेश कुमार यांचा तरुणांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा एक प्रयत्न होता. “तुमच्यावर (ज्ञानेश कुमार) केवळ महाभियोगच चालवला जाणार नाही, तर तुम्हाला तुरुंगातही जावे लागेल,” असे नेहा बोरा यांनी विरोधकांच्या ‘नक्कल महाभियोग’ (mock impeachment) कार्यक्रमादरम्यान म्हटले.

Exit mobile version