Marathi e-Batmya

राहुल गांधी यांचे भाकित, नरेंद्र मोदी वर्षभरही पंतप्रधान पदावर टीकणार नाहीत

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षभरात पदावर टिकणार नाहीत. मोदी सरकार एका “संस्थात्मक बंडा”चा सामना करत असून, त्याबद्दल राहुल गांधी यांनी व्यवस्थेमधूनच “आतली माहिती” मिळत असल्याचा दावाही केला.

बुधवारी (३ जून, २०२६) काँग्रेसच्या राष्ट्रीय आदिवासी व्यावसायिक संमेलनात, पक्षाच्या एका बंद दाराआडच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, दोन घडामोडी एकाच वेळी घडत आहेत — एक म्हणजे, भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने आंतरराष्ट्रीय धक्क्यांपासूनचे संरक्षण काढून टाकल्यामुळे भारतावर एक अभूतपूर्व “आर्थिक त्सुनामी” आदळणार आहे, आणि दुसरे म्हणजे, संस्थांवरील मोदी सरकारचे नियंत्रण ढासळले असल्याचा आरोपही यावेळी केला.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, “तुम्हाला वाटते की निवडणूक आयोग पूर्णपणे नियंत्रणात आहे. ती तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता, मुख्य निवडणूक आयुक्तांनी पाठवलेले संदेश माझ्यापर्यंत येत आहेत. गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख आणि वरिष्ठ न्यायपालिकेचे सदस्यही बंड करून माहिती देत ​​आहेत. त्यामुळे, नियंत्रणाची यंत्रणा कोलमडली आहे,” असे सांगत त्यांचे व्हिडिओ समोर आले असल्याचेही यावेळी सांगितले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की,“आता लोकांना दिसत आहे की जनतेकडून प्रचंड दबाव येईल, आणि त्यांना जाणीव झाली आहे की जर ते याच दिशेने पुढे जात राहिले तर ते धोकादायक ठरेल. तुम्हाला काय वाटते? जर जनतेला कळले की निवडणूक प्रणालीत हेराफेरी झाली आहे आणि आर्थिक दबाव, गरिबी आणि त्रासामुळे ते संतप्त झाले, तर निवडणूक आयुक्त घाबरतील असे तुम्हाला वाटत नाही का? त्यामुळे, आता यंत्रणा हादरत आहे,” असेही यावेळी सांगितले.

तर जनतेचा दबाव दडपण्यासाठी सरकार “आणीबाणीसारखे काहीतरी लादू शकते”, असा इशाराही यावेळी दिला.

राहुल गांधी शेवटी बोलताना म्हणाले की, आपण दुसऱ्या टप्प्यावर जात आहोत. पूर्वी त्यांचे पूर्ण नियंत्रण होते, पण आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे… माझ्या अंदाजानुसार, मोदीजी एका वर्षात पंतप्रधान राहणार नाहीत, असे भाकीत यावेळी केले.

अधिक तपशील न देता, राहुल गांधी यांनी असा दावा केला की, त्यांना मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शाह यांचे पुत्र, इतर केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व त्यांच्या मुलांविषयी नियमितपणे माहिती मिळत असे असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version