‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रातील शेती परिवर्तनाची व्यापक जनचळवळ आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचे सर्वात मोठे यश आहे. आजचे १८ हजार शेतकरी गट पुढील काळात ५० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
वर्षा निवासस्थानी पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित ‘फार्मर कप २०२६’च्या शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान, अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत पुलकुंडवार, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यावेळी उपस्थित होते. झूम लिंकद्वारे राज्यातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
यावेळी स्मार्ट शेती ॲपचे लोकार्पण करण्यात आले.कृषि विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी २६ ऑगस्ट २०२५ पासून राज्यभरात ४६ तालुक्यात सुरू असलेल्या फार्मर कपच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
मुख्यमंत्री फडणवीस बोलताना म्हणाले की, या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२६’ या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वासच भविष्यातील कृषी परिवर्तनाचा पाया ठरेल.फार्मर कपमधील १८ हजार शेतकरी गट हे महाराष्ट्रातील शेती क्रांतीचे शिल्पकार ठरणार आहेत, त्यांच्या अनुभवातून लाखो शेतकरी प्रेरणा घेतील. विधानमंडळात महिला शेतकरी विधेयक मंजूर करण्यात येणार आहे. शेतीच्या मालकीमध्ये नाव नसलेल्या महिलांनाही अधिकृत शेतकरी म्हणून मान्यता दिली जाणार आहे. मागील वर्षी फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या गटांमध्ये सोयाबीन, कापूस आणि मका या पिकांच्या उत्पादनात सरासरी ७१ टक्क्यांनी वाढ झाली. सामूहिक खरेदीमुळे कृषी निविष्ठांवर १,५८४ कोटी रुपयांची बचत झाली, तर सामूहिक श्रमांमुळे एकरी सुमारे ६ हजार रुपयांची मजुरीची बचत झाली. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरत आहे. महाविस्तार ॲप आणि फार्मर कपमधील माहिती एकत्रित करून शेतकऱ्यांना अधिक प्रभावी मार्गदर्शन करण्यात येईल. फार्मर कपमधून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे राज्याच्या कृषी धोरणांमध्येही आवश्यक बदल करण्यात येतील. राज्य शासनाच्या विविध योजनांचे एकत्रित नियोजन (कन्व्हर्जन्स) केल्यास गटशेती अधिक सक्षम होईल. यावर्षी अल निनोमुळे पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व संरचनांची तातडीने दुरुस्ती, गाळ काढणे आणि पाणीसाठा वाढविण्याची कामे हाती घ्यावीत, जलयुक्त शिवारसारख्या उपक्रमांमुळे पूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीत मोठा दिलासा मिळाला होता, असे सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, फार्मर कपमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी गटांच्या गावांना स्वतः भेट देणार आहेत. शेतीचा विकास हे राज्यासमोरील सर्वात मोठे आव्हान असले तरी शासन, पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग आणि शेतकरी यांनी एकत्रितपणे काम केल्यास पुढील पाच ते सात वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रामध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणता येईल. प्रत्येक सहभागी शेतकरी हा आधीच विजेता असून, ही चळवळ राज्यातील कृषी समृद्धीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
लोकसहभागातून मिळणार शेती समृद्धीचा मार्ग– कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
कृषी मंत्री भरणे म्हणाले की, एकत्रितपणे शेती केल्यास आणि सामूहिक प्रयत्नातून शेतीचे नियोजन केल्यास उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांचे उत्पन्नही निश्चितपणे वाढू शकते. फार्मर कप उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या उमेद आणि आत्मविश्वासाचा संचार झाला आहे. विशेषतः स्वतःची जमीन नसतानाही एकत्र येऊन शेती करण्याचा निर्णय घेतलेल्या महिला गटांचे विशेष कौतुक आहे. प्रत्येकाचा शेतीशी असलेला भावनिक संबंध आणि बांधिलकी लक्षात घेऊन सामूहिक शेतीचा मार्ग स्वीकारल्यास महाराष्ट्र शेती क्षेत्रात पुन्हा आदर्श निर्माण करू शकतो. नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासन विविध मदत उपाययोजना प्रभावीपणे राबवत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीसह विविध निर्णय, वीज सवलती; तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
विकसित भारतासाठी शेतकऱ्यांच्या उन्नतीवर भर : आमिर खान
अभिनेते आमिर खान म्हणाले की, “विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर सर्वप्रथम शेतकरी उन्नत आणि सक्षम होणे आवश्यक आहे.राज्यभरात फार्मर कपच्या माध्यमातून १८ हजारांहून अधिक शेतकरी गटांची निर्मिती झाली आहे.या संपूर्ण उपक्रमात मेंटर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जसा एक उत्तम शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शेतकरी गटांना योग्य दिशा देऊन त्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावतील.हा उपक्रम डिजिटल आणि प्रत्यक्ष संपर्क यांचा प्रभावी संगम आहे. डिजिटल माध्यमातून अल्प खर्चात मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचता येते, तर प्रत्यक्ष संवादातून विश्वास आणि आत्मियता निर्माण होते. या दोन्हींच्या एकत्रित वापरामुळे हा प्रयोग अधिक प्रभावी ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या उपक्रमाच्या उच्चस्तरीय समितीतील सर्व सदस्यांनी केलेल्या नेतृत्वाचे कौतुक करत आमिर खान यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक आणि वैज्ञानिक शेतकऱ्यांना आपले ज्ञान आणि अनुभव देत असल्याने त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकरी एकत्र आले की त्यांची ताकद वाढते. गटशेती आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, असे सांगत त्यांनी यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याचे नमूद केले. पाणी अडवा, पाणी जिरवा या कामांतर्गत गावांमधील जलसंधारणाची कामे गतीने करावीत आणि अपूर्ण कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी विविध बचत गटांशी साधला संवाद
विविध जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शेतकरी गट, कृषि विभाग आणि उमेदचे मार्गदर्शक यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. यावेळी १६ महिला शेतकरी एकत्र येवून २४ एकर शेती करणा-या चैत्राली यांनी स्वत:ची ओळख कशी घडवली त्याचा प्रवास मांडला. नंदुरबारचे सहायक कृषि अधिकारी अर्जुन पावरा यांनी दुर्गम भागात काम करतानाचे शेतकऱ्यांसोबतचे अनुभव सांगितले. नाशिक येथील अन्नदाता शेतकरी गट यांनी फार्मर कप शुभारंभ प्रसंगीच ५ लाख रूपयांची बचत केली असल्याचे सांगितले. चंदगडचे प्रभाग समन्यवक लीना लोबो शेतीची आवड निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली, ठाण्याच्या जय भवानी भात उत्पादक शेतकरी गटाने विषमुक्त शेती, आणि स्वच्छतेचा उपक्रम याबाबत माहिती दिली, महाडचे बीएमएम संचित पार्टे यानी फार्मर कप मुळे झालेल्या प्रगतीची माहिती दिली, पुणेच्या नारीशक्ती महिला शेतकरी गट यांनी पाणी समस्यावर मात करत नव्या पिढीला शेतकडे परत येण्यासाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. परभणीच्या सहायक कृषि अधिकारी ध्रुपद विखे, शेतकरी भंडारा जिल्ह्यातील भुमिपूत्र शेतकरी लक्ष्मण पुस्ताडे, सहायक कृषि अधिकारी नोहान सोनावणे यांनीही यावेळी अनुभव कथन केले.
मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागार डॉ. आनंद बंग,मुख्यमंत्री यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान,पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ, पाणी फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.अविनाश पोळ, पाणी फाउंडेशनच्या मुख्य कार्यपालन अधिकारी रीना दत्ता, सह्याद्री फार्म्सचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि अध्यक्ष विलास शिंदे, एटीई चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पाणी फाउंडेशनचे प्रकल्प संचालक नामदेव ननावरे, कोइटा फाउंडेशनचे संस्थापक मुख्य कार्यपालन अधिकारी साहिल भट्टड, सह-संस्थापक रिझवान कोइटा,कोइटा फाउंडेशन व्यवस्थापकीय संचालक रेखा कोइटा,मायक्रोवेअर कॉम्प्युटिंग अँड कन्सल्टिंगचे संजय संगल,मुख्य कार्यकारी अधिकारी टाटा मोटर्स फाउंडेशनचे विनोद कुलकर्णी उपस्थित होते.
