अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेली याचिका योग्य खंडपीठासमोर सादर करण्याचे आदेश बुधवारी उच्च न्यायालयाने महानिबंधक कार्यालयाला दिले.
उच्च न्यायालयाने ही याचिका महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित असल्यामुळे न्या. सारंग कोतवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणे अपेक्षित असल्याचे सालियनच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले, त्याची दखल घेऊन न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले.
दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत १४ जून २०२० रोजी उपनगरीय वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे नमूद केले. तरीही त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. ज्या रहस्यमय, गूढ परिस्थितीत दिशा मृत अवस्थेत आढळली त्या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी तिचे वडील वडील सतीश सालियन यांनी याचिकेतून केली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची तसेच उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून अटक करण्याची प्रमुख मागणीही याचिकेतून केली आहे.
