शीना बोरा हत्याकांड प्रकरणावर येत्य़ा सोमवारपासून म्हणजेच १० मार्चपासून नियमित सुनावणी सुरू होणार आहे. विशेष न्यायाधीशांच्या बदलीमुळे या प्रकरणावर मागील चार महिन्यापासून सुनावणी होऊ शकली नव्हती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, येत्या सोमवारपासून या खटल्यावर नियमित सुनावणी घेण्यात येईल, अशी माहिती नवनियुक्त विशेष न्यायाधीश जे. पी. दरेकर यांनी या खटल्यातील संबंधित सरकारी आणि पक्षकाराच्या वकिलांना दिली.
या खटल्यावर शेवटची महत्त्वाची सुनावणी गेल्यावर्षी २३ ऑक्टोबर रोजी विशेष सीबीआय न्यायाधीश एस.पी. नाईक निंबाळकर यांची बदली होण्यापूर्वी झाली होती. या प्रकरणी शीना बोराची आई इंद्राणी मुखर्जी मुख्य आरोपी आहे.
२०१२ रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली. इंद्राणीचा वाहनचालक शामवर रायला अटक करण्यात आल्यानंतर चौकशीदरम्यान या हत्याकांडाचा साल २०१५ मध्ये उलगडा झाला. इंद्राणीने आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपल्या पहिल्या पतीपासूनची मुलगी शीनाची हत्या केली आणि २५ एप्रिल २०१२ रोजी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी इंद्राणी जामीनावर बाहेर आहे. सर्व आरोपींविरुद्ध आरोप निश्चित झाल्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणी २३७ साक्षीदार असून त्यापैकी ९० हून अधिक साक्षीदारांची न्यायालयाने साक्ष नोंदवली आहे.
