अंथरुणात खिळलेल्या पतीचे कायदेशीर पालकत्व आपल्याला देण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका पत्नीच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. तिच्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठतांना याचिकाकर्त्यींच्या पतीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले. तसेच याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत त्याच्या मालमत्तेबाबत निर्णय जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयात याचिकाकर्तीचा पती रुग्णालयात आणण्याच्या स्थितीत नाही. तो श्वसनाशी संबंधित ब्राँकायटिस आजाराने त्रस्त असून तो अंथरुणावर खिळलेला आहे. वैद्यकीय नलिकेद्वारे अन्न पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती याचिकाकर्त्यींच्या वतीने वकील कौशल ताम्हाणे यांनी न्यायालयाला दिली. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाच्या न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने घेतली.
तसेच जे.जे रुग्णालयाने न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरचा समावेश असलेल्या वैद्यकीय मंडळाची स्थापना करण्याचे आदेश जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठतांना दिले. मंडळाने याचिकाकर्तीच्या घरी जाऊन तिच्या पतीची वैद्यकीय तपासणी करावी. तसेच त्यांच्या वैद्यकीय अहवाल २२ एप्रिल पूर्वी सादर करण्याचेही आदेश दिले. तोपर्यंत याचिकाकर्तीच्या पतीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची स्थिती जैसे थे ठेवावी, आणि या प्रकणातील अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून सुनावणी तहकूब केली.
