मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्याविरोधात नुकतेच आरोपपत्र दाखल झाले असून दोघांनीही कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी दाद मागावी, असे राज्य सरकारकडून मंगळवारी उच्च न्यायालयात सांगण्यात आले. परंतु, न्यायालयाने दोघांच्या जामिनासाठीच्या याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले आणि आरोपपत्राची पत्र सादर न्यायालयात करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले.
सिंधुदर्ग सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जयदीप आपटे आणि डॉ चेतन पाटील दोघांनीही जामिनिसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अनिल किलोर यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी या दोघांची याचिका सुनावणीसाठी आली. त्यावेळी दोन्ही आरोपींविरोधात दोन-तीन दिवसांपूर्वीच आरोपपत्र दाखल केल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील गीता मुळ्ये यांनी न्यायालयाला दिली. तसेच, याच कारणास्तव दोन्ही आरोपींनी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात दाद मागण्यात यावी, असेही स्पष्ट केले. त्याला जयदीप आपटे आणि डॉ चेतन पाटील यांच्या वतीने वकील निरंजन मुंदरगी आणि गणेश सोवनी यांनी विरोध केला. तेव्हा, दोन्ही आरोपींना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या याचिकांवर येथेच सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट करून सुनावणी २१ नोव्हेंबर रोजी ठेवताना आरोपपत्राची प्रत सादर करण्याचे आदेश सरकारी वकिलांना दिले.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा कांस्य पुतळा कोसळल्याचा दावा आपटेने जामिनाची मागणी करताना केला आहे. यापूर्वी, आपण नौदलासाठी कांस्य पुतळ्यांचे काम केले आहे. परंतु, नौदलाकडून आपल्या कामाबाबत कधीच तक्रार केली गेली नाही. याउलट, धातू शास्त्रांतील तांत्रिक कौशल्याबाबत काहीच माहीत नसलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनी दुर्घटनेच्या नऊ तासांच्या आतच या प्रकरणी तक्रार नोंदवल्याचा दावा आपटेने याचिकेत केला आहे. शिवाय, पुतळा कोसळल्यामुळे कोणीही जखमी झाल्याचे तक्ररीत नमूद नाही. त्यामुळे, हे प्रकरण निष्काळजीपणाचे असू शकते, असा दावाही आपटे याने याचिकेत केला आहे. हा पुतळा अनेक शतके टिकेल आणि सुस्थितीत राहील हे लक्षात घेऊन खबरदारीचे सर्व उपाय केल्याचा दावा देखील आपटे यांनी केला आहे.
