दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटीवर यंदाच्या वर्षीही `ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी ख्रिस्ती समुदायाला सशर्त परवानगी दिली. येत्या ८ डिसेंबर रोजी हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
महापालिकेने यावर्षीही महोत्सवास परवानगी नाकारल्याने प्रभू येशु जन्मोत्सव सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चौपाटीवर संगीत महोत्सव आयोजित करण्यासाठी आयोजकांना यापूर्वीही परवानगी देण्यात आल्याची बाब न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. त्याची दखल घेऊन न्या. अजय गडकरी आणि न्या. कमल खाता खंडपीठाने यावर्षी ट्रस्टला संगीत महोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली. महोत्सवाच्या तयारीसाठी दोन दिवस आधी आयोजकांना जागा संबंधित जागा उपलब्ध करण्याचे न्यायालयाने आदेशही पालिका प्रशासनाला दिले.
चौपाटीवरील वाळू उपशाच्या मुद्यांवर चिंता व्यक्त करून या ठिकाणी कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यास उच्च न्यायालयाने २०१८ मध्ये मज्जाव केला आहे. मात्र, त्याचवेळी कृष्णलीला, रामलीला, गणेश विसर्जन आणि ख्रिसमस या उत्सवांना परवानगी दिली जाईल, असेही स्पष्ट केले होते. चौपाटीच्या चार हजार १८० चौरस मीटर परिसरात या उत्सवांना परवानगी देण्याची अटही न्यायालयाने घातली होती. तथापि, याचिकाकर्त्या ट्रस्टने उच्च न्यायालयात धाव घेऊन पुनरावलोकन याचिका केली होती. या प्रकरणी २०१८ मध्ये देण्यात आलेल्या आदेशात आपण प्रतिवादी नसलो तरीही त्यांना `ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी १५ हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे.
त्यामुळे, पुनरावलोकन याचिकेवर निर्णय देईपर्यंत `ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी चौपाटीवरील १५ हजार चौरस मीटर परिसर वापरण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर, मुंबईतील चौपाटीवर ठराविक चौरस मीटर परिसरात १५ हजाराहून अधिक समुदायाला सामावून घेता येणार नाही, अशावेळी तेथे चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण होऊ शकते, असे आदेशात नमूद करत उच्च न्यायालयाने मागील वर्षी ट्रस्टला गिरगाव चौपाटीवर `ख्रिसमस म्युझिकल फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यास सशर्त परवानगी दिली होती.
