राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, सहआयुक्त रवी गायकवाड, संदेश चव्हाण, मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. ना.कों. भोसले, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, प्रा. सुहासिनी किर्तीकर, डॉ. ज्योती ठाकरे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, प्रा. डॉ. प्रदीप ढवण, अरुण म्हात्रे, मीनाक्षी जयकर, स्वाती गावडे, शिवाजी गावडे, दीपा ठाणेकर, मोहन पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवहन विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांनी ऑनलाईन किंवा आपल्या परिसरातील प्रत्यक्ष केंद्रांमध्ये जाऊन मराठी भाषा शिकून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रशिक्षणात सुमारे चार हजार शिक्षक सहभागी होणार असून, प्रत्येक महिन्यातील चार शनिवार आणि रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. काही शिक्षक मानधनाशिवाय प्रशिक्षण देणार असून, काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.
मानधनासाठी मराठी भाषा विभागाकडून दोन कोटी रुपयांची तरतूद
मराठी भाषा प्रशिक्षणासाठी आवश्यक मानधनाच्या खर्चासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. उर्वरित खर्च परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणानंतर चालकांना प्रमाणपत्र
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांनी या उपक्रमात सहभागी होऊन यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांना परिवहन विभागामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यासाठी चालकांची मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमता तपासण्यासाठी प्रशिक्षण केंद्रांमध्ये तोंडी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहितीही दिली.
परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांनी प्रशिक्षण केंद्रांची अंतिम यादी निश्चित करून ऑनलाईन आणि ऑफलाईन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, रिक्षा-टॅक्सी चालकांची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यांनी विनामूल्य उपलब्ध असलेले ऑनलाईन अथवा ऑफलाईन प्रशिक्षण घेऊन व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. चालकांच्या वेळेनुसार प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार असली, तरी १५ ऑगस्टपर्यंत मराठी भाषा शिकली नाही तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चारही केला.
प्रशिक्षणासाठी करण्यात आलेली तयारी :
सचित्र आणि सोप्या भाषेतील पाठ्यक्रम पुस्तिका.
प्रत्येक केंद्रांतर्गत उपकेंद्रे उभारली जाणार.
रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर, रॅपिडो वाहनांवर मराठी संदर्भातील जनजागृती स्टिकर्स लावले जाणार.
मराठी भाषा प्रचार-प्रसारासाठी विशेष बॅनर्स तयार करणार.
