पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक विकास या परस्परविरोधी गोष्टी नसून, दोन्हींचा समतोल साधणे शक्य आहे, हे भारताने आपल्या कृतीतून जगाला दाखवून दिले आहे. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि लोकसहभागाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा मार्ग अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ब्रिटनचे राजपुत्र आणि अर्थशॉट प्राईझचे संस्थापक अध्यक्ष प्रिन्स विल्यम यांनी केले.
मुंबईतील जिओ कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित अर्थशॉट प्राईझ इम्पॅक्ट असेम्ब्ली कार्यक्रमात प्रिन्स विल्यम बोलत होते. यावेळी अर्थशॉट प्राईझचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेसन कनौफ आणि चेअरमन जेस्पर ब्रॉडीन यांच्यासह अर्थशॉट प्राईझचे अंतिम फेरीतील स्पर्धक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
भारताच्या पर्यावरणपूरक विकासाचा उल्लेख करताना प्रिन्स विल्यम यांनी भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीचे विशेष कौतुक केले. भारताने स्थापित वीज निर्मिती क्षमतेपैकी ५० टक्के क्षमता बिगरजीवाश्म ऊर्जा स्रोतांमधून निर्माण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित मुदतीच्या पाच वर्षे आधीच साध्य केले आहे. तसेच, गेल्या दशकभरात देशाची सौरऊर्जा क्षमता ५० पटींहून अधिक वाढली आहे, असे त्यांनी नमूद केले.
भारतीय नवकल्पनांची जागतिक दखल
अर्थशॉट प्राईझमध्ये भारताचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे सांगताना, या पुरस्काराच्या इतिहासात सर्वाधिक विजेते आणि अंतिम फेरीतील स्पर्धक भारतातून असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. २०२१ मध्ये ‘क्लीन अवर एअर’ या विभागात पुरस्कार मिळविणाऱ्या ‘टकाचार’ या भारतीय संस्थेचे त्यांनी विशेष उदाहरण दिले. शेतीतील पिकांचे अवशेष आणि जंगलातील कचरा जाळण्याऐवजी त्यापासून इंधन व खतासारखी विक्रीयोग्य उत्पादने तयार करणारे पोर्टेबल तंत्रज्ञान टकाचार संस्थेने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे धुराचे उत्सर्जन ९८ टक्क्यांनी कमी होण्यास मदत झाली असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
उष्णतेपासून संरक्षण ते प्रदूषणमुक्त वाहतूक
२०२६ च्या अर्थशॉट प्राईझच्या अंतिम फेरीतील दोन भारतीय उपक्रमांचाही प्रिन्स विल्यम यांनी गौरव केला. ‘महिला हाउसिंग ट्रस्ट’ या संस्थेकडून कमी उत्पन्न गटातील महिलांना वाढत्या उष्णतेचा सामना करण्यासाठी थंड छतांसारख्या उपाययोजना आणि परवडणाऱ्या विमा सुविधांद्वारे मदत केली जात आहे. तर ‘महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी’ कंपनी परवडणाऱ्या इलेक्ट्रिक रिक्षांच्या माध्यमातून शहरी भागातील प्रदूषण कमी करण्यासाठी योगदान देत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले,
‘जगाने एकमेकांच्या अनुभवांतून शिकावे’
पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधण्याची जबाबदारी केवळ एका देशाची किंवा संस्थेची नसल्याचे सांगून, विविध देशांनी एकमेकांच्या अनुभवांतून शिकण्याचे आवाहन प्रिन्स विल्यम केले. स्वच्छ वाहतूक, अक्षय ऊर्जा, शेती विमा आणि घातक रसायनांवरील नियंत्रण अशा विविध क्षेत्रांत जगभरात उल्लेखनीय काम सुरू आहे. या उपायांना योग्य पाठबळ मिळाल्यास त्यांचा विस्तार जागतिक स्तरावर करता येईल, असे नमूद केले.
सौरऊर्जेच्या प्रगतीचे उदाहरण देताना प्रिन्स विल्यम म्हणाले, जगाला पहिली एक टेरावॅट सौरऊर्जा क्षमता उभारण्यासाठी जवळपास ७० वर्षे लागली; मात्र दुसरी एक टेरावॅट क्षमता अवघ्या दोन वर्षांत उभारली गेली. एका यशस्वी नवकल्पनेतून पुढील बदलांचा मार्ग सुकर होतो आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होऊ लागतात.
‘रंगबिरंगी दुनिया’तून भविष्याकडे पाहा!
आपल्या भाषणात हिंदीतील ‘रंगबिरंगी दुनिया’ या शब्दप्रयोगाचा उल्लेख करत प्रिन्स विल्यम यांनी भविष्याकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. विकास की पर्यावरण, समृद्धी की निसर्गसंवर्धन, अशा द्वंद्वात्मक विचारांपलीकडे जाऊन सर्वांना सामावून घेणारे शाश्वत भविष्य घडविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
शेवटी बोलताना प्रिन्स विल्यम म्हणाले की, अर्थशॉट प्राईझच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांत अनेक प्रभावी कल्पना आणि उपाय समोर आले आहेत. आता या स्पर्धेतील नवकल्पना शोधणे, त्यांना आर्थिक व सामाजिक पाठबळ देणे आणि त्यांचा जगभर विस्तार करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शासन, उद्योगजगत आणि नागरिकांनी अंतिम फेरीतील स्पर्धकांना आपल्या कल्पना, प्रभाव आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून मदत करावी, असे आवाहन केले.
यावेळी स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्पर्धकांची व त्यांनी केलेल्या कामाची ओळख करून देण्यात आली.
