Marathi e-Batmya

एमएमआरडीए चौकशी समितीतून जॉनी जोसेफ यांना हटवा; कोर्ट-मॉनिटर चौकशी करा

एमएमआरडीए MMRDA च्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांनी गंभीर तक्रारी केल्या असून, पुणे महानगरपालिका (PMC) भरती प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष धनंजय शिंदे यांनी सरकारकडे निष्पक्ष चौकशी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

एमएमआरडीए MMRDA भरती घोटाळा चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमएमआरडीए MMRDA आणि मुंबई मेट्रो-१शी संबंधित त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेमुळे चौकशीच्या निष्पक्षतेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याने त्यांना समितीतून तात्काळ हटवून प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र SITमार्फत चौकशी करावी. परीक्षा डेटा, सर्व्हर लॉग्स, सीसीटीव्ही CCTV फुटेज आणि अन्य डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे. या प्रकरणी काँग्रेसने महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट मागितली असून, स्वतंत्र निवेदन सादर केले जाणार आहे.

पीएमसी PMC भरतीतील तक्रारींचीही स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. गंभीर गैरप्रकार किंवा अनियमितता आढळल्यास भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात यावी, तसेच प्रामाणिक उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.

काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

1. MMRDA भरतीची कोर्ट-मॉनिटर SITमार्फत चौकशी करावी.

2. जॉनी जोसेफ यांना चौकशी समितीतून तात्काळ हटवावे.

3. MMRDA भरतीतील डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करावे.

4. PMC भरतीतील तक्रारींची स्वतंत्र चौकशी करावी.

5. अनियमितता सिद्ध झाल्यास PMCची फेरपरीक्षा घ्यावी.

6. दोषींवर कठोर कारवाई करून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.

सरकारी नोकरीसाठी वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी कोणतीही तडजोड काँग्रेस स्वीकारणार नाही. दोषींवर कारवाई आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत महाराष्ट्र काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील.

Exit mobile version