Marathi e-Batmya

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महापालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांची दादागिरी

मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकासनिधी वाटप हे सर्व नगरसेवकांना समान प्रमाणात झाले पाहिजे पण बीएमसीतील सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांची खैरात आणि काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची अवघ्या काही लाखात बोळवण करण्यात आलेली आहे. महापालिकेतील पैसा भाजपा शिंदेसेनेच्या पक्षाचा निधी नाही तो मुंबईकरांचा पैसा आहे आणि तो मुंबईकरांच्या विकासासाठी द्या. अशा प्रकारचा अन्याय काँग्रेस पक्ष सहन करणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला.

बीएमसीतील निधी वाटपावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष लोकशाही व संवैधानिक मुल्ल्यांची पायमल्ली करत आहे हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. राज्य सरकार विरोधी पक्षांशी शत्रुत्वाच्या भावनेने वागते त्याचाच कित्ता महापालिकेतही गिरवला जात आहे. स्थायी समितीला मिळालेल्या ८०० कोटी रुपयांच्या विकास निधीतून सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांना कोट्यवधी रुपये देण्यात आले आहेत. भाजपाचे सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना तब्बल २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर उपमहापौर संजय घाडी यांना १० कोटींचा निधी देण्यात आला आहे. भाजपाच्या सर्व नगरसेवकांना प्रत्येकी २.२५ कोटी रुपये देण्यात आले आहेत, परंतु विरोधी पक्षांच्या अनेक नगरसेवकांना अवघे २५ लाख रुपये देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्ष, एमआयएम व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) या विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनाही भरीव निधी दिला आहे. या पक्षांशी भाजपाचे काय हितसंबंध आहेत? त्यांच्यावर एवढे प्रेम का आहे? व काँग्रेस पक्षाशीच काय राग आहे, असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाले की, विरोधी पक्षाचा नगरसेवक असला तरी त्यांनाही जनतेनेच निवडून दिले आहे, त्यांना कमी विकासनिधी देणे म्हणजे त्या भागातील नागरिकांना विकासापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. विकासनिधीसाठी दिला जाणारा पैसा हा काही पक्षाचा किंवा कोणत्या नेत्यांचा वैयक्तीक पैसा नाही तर तो मुंबईकरांचा आहे व मुंबईकरांना तो मिळालाच पाहिजे. विकास निधीतील दुजाभावाविरोधी काँग्रेस पक्ष जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही सांगितले.

Exit mobile version