मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी व जागतिक कीर्तीचे शहर आहे. आज मुंबईत हवा प्रदुषणाने उच्चांक गाठला असून श्वसनाच्या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत AQI १५० ते २०० पर्यंत आहे तर काही भागात तो ३०० आहे. विषारी वायुच वाढलेलं हे प्रमाण मुंबईकरांसाठी मोठे संकट बनले आहे. मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे त्यासाठी बांधकाम थांबविणे, अँटी-डस्ट गन, बांधकामाच्या ठिकाणी व्हील वॉश सिस्टम यासारख्या उपाययोजना तात्काळ करणे आवश्यक आहे, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी म्हटले आहे.
नियम ३७७ नुसार खासदार वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत मुंबईतील हवा प्रदुषणाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी त्या म्हणाल्या की, मुंबईतील एक्यूआय हा संपूर्ण शहरात सातत्याने घातक बनत चालला आहे. बेसुमार बांधकामे आणि अनियंत्रित वृक्षतोडीमुळे महाराष्ट्र राज्यातील पर्यावरणावर गंभीर परिणाम झाला आहे. देशात दरवर्षी १७ लाख लोकांचा मृत्यु हवा प्रदूषणामुळे होत आहे. या प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आयुष्यमान ३.७ वर्षाने घटले असल्याचे एका अभ्यासात सांगितले आहे.
पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आरे कॉलनीत मेट्रो कार शेडसाठी २००० झाडांची कत्तल केली, धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठीही मोठी वृक्षतोड केली जात आहे. नाशिकमध्ये साधुग्राम साठी १७०० झाडांची कत्तल केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याने पर्यावरणावर परिणाम होऊन हवा प्रदुषणात वाढ होत आहे आणि ते चिंताजनक आहे. आमच्या #MumbaiCleanAirManifesto मध्ये नमूद केल्याप्रमाणे लवकरच उपाययोजना केल्या नाहीत तर मुंबईची अवस्था दिल्लीपेक्षा वाईट होईल, असा इशाराही दिला.
