Marathi e-Batmya

आदित्य ठाकरे यांचा आरोप, …तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही

मुंबईत दसरा दिनानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाचा परंपरागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पहिल्यांदाच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे भाषण करणार होते. त्यामुळे आदित्य ठाकरे पहिल्या दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत अदानीची कामे होत नाहीत. तोपर्यंत राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागणार नसल्याचा गौप्यस्फोट करत या खोके सरकारला घालविल्याशिवाय ही लढाई संपणार नसल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.

आदित्य ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, मला आठवतय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत युवा सेनेची स्थापना याच शिवतीर्थ मैदानावर स्थापन करण्यात आली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हातात तलवार देत म्हणाले होते की महाराष्ट्रासाठी लढ. मागील १०ते १५ वर्षापासून येत आहे. शिवसेना प्रमुखांसह उद्धव ठाकरे यांचेही भाषण मी ऐकले आहे. २०२४ साल हे महत्वाचं वर्ष आपल्यासाठी असून कदाचित आजोबांनीही त्यावेळी मला सांगितलं असेल. आपल्याला बदल घडवायचं आहे. आपणा सर्वांना २०२४ ची विधानसभा निवडणूक कधी लागणार याची आपण सर्वजण वाट बघत आहोत. पण तो क्षण जवळ आलेला आहे असे सांगत खोके सरकारने जी भ्रष्टाचाराची घाण करून ठेवली आहे ती साफ करण्यासाठी आपलेच सरकार येणार असल्याचा दावाही यावेळी व्यक्त केला.

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एका अधिकाऱ्याने मला सांगितले की, जोपर्यंत अदानीची सगळी कामं होत नाहीत. तोपर्यंत राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होणार नाही. त्यामुळेच आपल्या खऱ्या शिवसेनेसाठी ही लढाई महत्वाची आहे. राज्यात लूट आणि भ्रष्टाचार सुरु आहे. आता तुम्हीच ठरवा की, मुंबई अदानीच्या घशात घालायची का हे आता तुम्हाला ठरवायचं आहे. मुंबईतील प्रत्येक उद्योग आणि प्रकल्प गुजरातला नेण्यात आली आणि कामाची कंत्राट त्यांच्या मित्रांना दिली जात आहेत. या ५० खोक्याच्या सरकारला रोखायचं असेल तर आपल्याला या निवडणूकीत ताकद दाखवावी लागेल असा इशारा देत आपल्या समोर होत असलेले भ्रष्टाचाराच्या माध्यमातून होणारी लूट थांबवायची की ती तशीच सुरु ठेवायची याचा निर्णय तुमच्या हातात असल्याची आठवणही यावेळी करून दिली.

Exit mobile version