Marathi e-Batmya

अंबादास दानवे यांचा आरोप, जलसंधारण विभाग मोहित कंबोज चालवतो…कोण आहे हा ?

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभाग मोहित कंबोज हा चालवत असल्याचा गंभीर आरोप करत हा कोण आहे मोहित कंबोज त्याला विचारल्याशिवाय विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर हे पाणीही पीत नाहीत असा गंभीर आरोप आज विधान परिषदेत केला. त्यामुळे विधान परिषदेत सरकारबाहेरील मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मोहित कंबोज यांचे नाव पटलावर आले. दरम्यान मोहित कंबोजच्या अनुषंगाने करण्यात आलेले सर्व म्हणणे रेकॉर्डवरून काढून टाकावे अशी मागणी भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी केली.

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या भाषणावरील सरकारने मांडलेल्या चर्चेत अंबादास दानवे हे सहभागी झाले होते. त्यावेळी मोहित कंबोज याचा प्रभाव जलसंधारण विभागावर कसा आहे याची सविस्तर माहिती दिली.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, हा कोण आहे मोहित कंबोज, जो संपूर्ण जलसंधारण विभाग आणि सरकार चालवतो, त्याला विचारल्याशिवाय विभागाचा आयएएस अधिकारी दिपक कपूर पाणीही पित नाही की कोणताही निर्णय घेत नाही. मोहित कंबोज हा सरकारही चालवित असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यावर भाजपाचे प्रसाद लाड आणि गटनेते प्रविण दरेकर यांनी अंबादास दानवे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर अंबादास दानवे म्हणाले की, तुम्हाला बोलण्याची संधी मिळाल्यावर तुम्हाला जे काही म्हणणे मांडायचे ते मांडा. पण मला दिलेल्या वेळेत मला थांबविण्याचा प्रयत्न करू नका असे सांगत मला काही घाबरायचं कारण नाही की, कारण मी काही कोणत्या मंत्र्याचे नाव घेतले नाही. जे त्या विभागात चालले आहे ते फक्त मी मांडतोय असेही यावेळी सांगितले.

अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले की, जलसंधारण विभागाच्या कोणत्याही प्रकल्पाबाबतचा निर्णय आणि तो प्रकल्प कोणाला मंजूर करायचा कोणाला नाही याचा निर्णय मोहित कंबोजला विचारल्याशिवाय होत नाही. इतकेच नव्हे तर विभागाचा आयएएस अधिकारी दिपक कपूरही त्याला विचारल्याशिवाय पाणीही पित नाही. तो कोण आहे का, ऐवढे त्याचे ऐकले जातेय, याची सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणीही यावेळी केली.

यावेळी अंबादास दानवे यांनी विविध विभागाच्या खात्यांतर्गत सुरु असलेल्या अनागोंदीवर भाष्य केले. त्याचबरोबर लाडकी बहिण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्कालीन सरकारच्या काळात वारेमाप कामांची टेंडर काढण्यात आली. मात्र त्या कामाच्या निधीची तरतूद केली नाही. त्यामुळे अनेक ठेकेदार आणि कंत्राटदार आणि कामाची बिलं मिळत नसल्याने आंदोलन करत असल्याचा मुद्दाही यावेळी मांडला.

Exit mobile version