Marathi e-Batmya

अमित ठाकरे यांच्यासाठी भाजपा सरसावलीः बंडखोरांची भाजपा नेते मनधरणी करणार

विधानसभा निवडणूकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच माहिम विधानसभा निवडणूकीत उभे राहिले आहेत. अमित ठाकरे यांचा विधानसभेतील मार्ग सुकर व्हावा यासाठी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दादर-माहिममधील उमेदवार सदा सरवणकर यांना माघारी घेण्यासाठी सातत्याने शिंदेच्या शिवसेनेकडून विनंत्या, दबाव तंत्राचा वापर करण्यात येत आहे. मात्र सदा सरवणकर हे आपली उमेदवारी मागे घेण्यास अद्याप तयार नाहीत. त्यातच आता सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपाने पुढाकार घेतला असून अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची इच्छा महायुतीची असल्याचे देवेंद्र फडणवीस हे पुढे सरसावले आहेत.

त्याचबरोबर भाजपामधील बंडोबांना कसे थंड करायचे याबाबत भाजपाच्या नेत्यांच्या बैठकीत आज महत्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या अनेक नेत्यांनी भाजपाविरोधात बंडखोरी करत अर्ज दाखल केले आहेत. या नेत्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यास भाजपा आणि महायुतीचे मोठे नुकसान होऊ शकते, यादृष्टीने भाजपाने बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांची मनधरणी करण्याची जबाबदारी काही मोजक्या नेत्यांवर सोपविली असल्याची माहिती पुढे आली आहे.

बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यभरातील बंडखोर नेत्यांशी बोलून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगणार आहेत, तर उच्च शिक्षण व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुणे, कोल्हापूर येथे भाजपाला आवाहन करणार आहेत. सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांशी चर्चा करणार असून, याशिवाय विदर्भाची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच कोकणातील बंडोबांचे बंड थंड करण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार, २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता. तिकीट न मिळाल्याने मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांनी भाजपविरोधात बंडखोरी करत अर्ज दाखल केले. बंडखोरांमुळे महायुतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती भाजपाला आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करून त्यांना उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. तिकीट न मिळाल्याने पक्षाविरोधात बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरणाऱ्या नेत्यांशी बोलून त्यांचे मन वळवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

विनोद तावडे गोपाल शेट्टींना पटवणार

बोरिवली विधानसभेतून तिकीट न मिळाल्याने भाजपाविरोधात बंडखोरी करणाऱ्या माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांचे बंड क्षमविण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यावर ही जबाबदारी सोपविताच ते सक्रिय झाले असून त्यांनी गोपाळ शेट्टी यांच्याशी बोलणीही सुरू केली आहे. आता गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यात कितपत यशस्वी ठरतात आणि भाजपाचे अधिकृत उमेदवार संजय उपाध्याय यांचा निवडणूकीतील विजयाचा मार्ग कितपत यशस्वी ठरतील हे आता निकालाच्या दिवशी समोर दिसून येईल.

Exit mobile version