Marathi e-Batmya

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने विविध योजनांच्या माध्यमातून रेवडी वाटपाच्या योजना सतत जाहिर करत आहे. तसेच विरोधातील महाविकास आघाडीला हादरे देण्याच्या अनुषंगाने काही योजनाही भाजपाकडून आखण्यात येत आहे. मात्र राज्यातील प्रत्येक विधानसभा जिंकायचीच म्हणून भाजपाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांची योग्यता आणि कामाची तपासणी करण्याचे काम सुरु असतानाच सोलापूरातील विद्यमान दोन आमदारांपैकी एका उमेदवाराला घरी पाठविणार असल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.

सोलापूराच्या दौऱ्यावर नुकतेच शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत हे आले होते. त्यावेळी संजय राऊत यांनी एका जिल्हा परिषद सदस्याला आगामी विधानसभा निवडणूकीची तयारी करण्याची सूचना करत हाती मशाल देणार असल्याचे आश्वासनही यावेळी दिले. त्यामुळे या नवतरूण उमेदवाराच्या हाती मशाल दिल्यानंतर भाजपाच्या विद्यमान आमदाराचा पराभव निर्विवाद असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीही विद्यमान आमदाराच्या विरोधात सोलापूरात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. तसेच कार्यकर्त्ये आणि मतदार यांना या आमदाराकडून योग्य ती वागणूक देत नसल्याच्या तक्रारीही भाजपा श्रेष्ठींकडे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

तर दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीकडून त्यांच्या ताब्यात असलेल्या आमदारांच्या जागांसह भाजपाच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधणी केली आहे. तसेच दलित-मुस्लिम मतांबरोबर सोलापूरात लिंगायत समाजाच्या मतदारांना आणि व्यावसायिकांनाही पुन्हा महाविकास आघाडीसोबत जोडण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहेत.

तसेच भाजपाचे आमदार मागील १० वर्षापासून सोलापूरचे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र सोलापूरच्या विकासासाठी कोणतेच प्रयत्न केले नसल्याची चर्चाही यावेळी जोरात सुरु आहे. या दोन्ही आमदारांनी स्वतःची आमदारकी त्यांच्या वैयक्तिक व्यवसायाचे उत्पन्न वाढविण्यासाठीच करत असल्याची चर्चाही सोलापूरात जोरात सुरू आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने ऐन निवडणूकीत विद्यमान आमदाराला तिकिट देऊन पराभूत झाल्यानंतर एक जागा कमी करून घेण्याऐवजी विद्यमान आमदाराला घरी पाठवा आणि नव्या इच्छुकाला तिकिट देत जागा निवडूण आणण्याची रणनीती भाजपाकडून स्थानिक पातळीवर आखण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version