Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन, आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय

जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे सध्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. त्यामुळे नियमित योग करून जीवनशैलीविषयक आजारांना दूर ठेवले पाहिजे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

जुहू बीचवरील फूड कोर्ट जवळ आयोजित १२ व्या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, शिवप्रकाश, केशव उपाध्ये, पवन त्रिपाठी, दीप्ती वायकर, उषा बेन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सातत्याने योग करणारा व्यक्ती हा कुठल्याही मानसिक परिस्थितीमध्ये असली तरी आलेल्या आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकतो. त्यामुळे योग विद्येचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. नियमितपणे योग करून आपण आपले शरीर निरोगी व मन प्रसन्न ठेवूया, असे आवाहनही यावेळी केले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगभरात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारताने मांडला. संयुक्त राष्ट्र संघाच्या इतिहासात सर्वात कमी कालावधीत आणि कुठलाही विरोध न होता मंजूर झालेला हा प्रस्ताव आहे. भारताने दिलेल्या प्रस्तावानुसार आज जगभरात योग होत आहेत. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व जगाला पटले आहे. विश्वामध्ये योग विद्या आणि योग चिकित्सेबदल मोठे कुतूहल निर्माण झाले असल्याचेही यावेळी सांगितले.

व्यक्ती ही केवळ शरीर नसून मन आणि आत्मा सुद्धा असल्याचे अधोरेखित करीत मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, माणसाचे मन निसर्गाशी जुळलेले आहे. त्यामुळेच योग विद्येमध्ये केवळ शरीराचा विचार न करता मन, आत्मा आणि शरीर या तिन्हींचा विचार करण्यात आलेला आहे. योग विद्येमध्ये मनाचा निसर्गातील तत्वांशी असलेला संबंध हा पुनर्जीवित करण्यात येतो. सातत्यपूर्ण योग केल्याचा परिणाम शरीरावर तर होतोच पण मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यावरही होतो.

कार्यक्रम प्रसंगी शिवप्रकाश यांनीही आपले विचार मांडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योगासने केली. कार्यक्रमाला योगशिक्षक, योग करणारे नागरिक उपस्थित होते.

Exit mobile version