Marathi e-Batmya

कुणाल कामरा प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन,…कठोर कारवाई करणार

स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विडंबनात्मक गाण्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान करणारे वक्तव्य केल्यावरून कुणाल कामरा यांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे पक्षाचे अर्जून खोतकर यांनी केली. तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांनीही याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी करत माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अपमानजनक शब्द वापरल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे सरकारने कारवाई केली होती. त्यानुसार कुणाल कामरा यांनेही विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपमान केल्याप्रकरणी अटक करण्याची कारवाई करावी अशी मागणी केली.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल खालच्या दर्जाची कॉमेडी करून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. असे  अपमानित करणे चुकीचे आहे. ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेला आदर आहे. त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसदार कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे. स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाही नाही. अपमानित करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वीकार केला जाईल, पण या स्वातंत्र्याचा स्वैराचार आणि दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करता येणार नाही. राजकीय कॉमेडी करा, व्यंग करा पण प्रसिद्धीसाठी जर कोणी अपमानित करत असेल तर त्याच्यांवर कठोर कारवाई केली जाईल असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version