Marathi e-Batmya

नाना पटोले म्हणाले, फडणवीसांची वक्तव्य फारशी मनावर घ्यायची नसतात

मुंबई: प्रतिनिधी

केंद्रात युपीएचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून टीका करणारे बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार आता केंद्रातील भाजपा सरकारने दरवाढ केली तरी टीका करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच या दोघांना इशारा दिला. त्या इशाऱ्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पटोले हे नवे नवे अध्यक्ष झाल्याचा टोला लगावला होता.

त्यास प्रतित्तुर देताना नाना पटोले हे ट्विट करत म्हणाले की, “सत्तापक्ष का नेता ना हुआ तो क्या हुआ विपक्ष का नेता तो हुआ,” याच नकारात्मक भूमिकेतुन माझे मित्र देवेंद्र फडणवीस अलिकडे वक्तव्य करीत असतात. त्यामुळे त्यांचे वक्तव्य फारसे मनावर घेण्याचे कारण नाही. पेट्रोल आणि गॅस दरवाढी संदर्भात मी जनतेच्या मनातील असंतोषाला वाचा फोडली आहे.

पटोले पुढे म्हणाले की, एरवी छोट्या-छोट्या गोष्टींवर टीव-टीव करणारे अभिनेते जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर गप्प का?… ही जनतेच्या मनातील भावना मी व्यक्त केली तर भाजप नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय? असा सवालही त्यांनी विचारला.

नेमके काय म्हणाले देवेद्र फडणवीस? पटोलेंच्या वक्तव्यावर     

दरम्यान, नाना पटोलेंनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या सिनेमाचं शूटिंग बंद पाडण्याच्या दिलेल्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीसांनी पब्लिसिटी स्टंट असल्याचा टोला लगावला. ”नाना पटोलेंचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. त्यांना माहितीये की अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांच्यावर काही बोललं, तर पब्लिसिटी मिळते. यात त्यांचंच भलं आहे. नवेनवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांनाही त्यांचं नाव कमवायचं आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की दिवसभर पब्लिसिटी मिळते. शूटिंग कसं आणि कोण बंद करू शकतं? इथे कायद्याचं राज्य आहे. तुम्ही सत्तारूढ पक्षाचे आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही मालक झालात असा होत नाही.

Exit mobile version