Marathi e-Batmya

केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रस्तावांच्या पाठपुराव्यासाठी ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम पोर्टल

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे केंद्र सरकारच्या मंत्रालयांकडे प्रलंबित असलेले प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी आणि त्यांच्या पाठपुराव्याची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व गतिमान करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

निवासी आयुक्त (गुंतवणूक) कार्यालय नवी दिल्ली आणि महाआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या या पोर्टलमुळे केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेल्या राज्य शासनाच्या प्रस्तावांचे ऑनलाइन ट्रॅकिंग करणे शक्य होणार आहे. देशातील राज्यांच्या निवासी आयुक्त कार्यालयांच्या स्तरावर अशा प्रकारची प्रणाली विकसित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आयुक्त ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले होते.

या पोर्टलची संकल्पना निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांची आहे. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणाऱ्या विविध प्रस्तावांची सद्यस्थिती, त्यावरील कार्यवाही, संबंधित मंत्रालयांकडून प्राप्त अभिप्राय आणि पाठपुराव्याचा संपूर्ण तपशील एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणे, हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे.यापूर्वी केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती निवासी आयुक्त कार्यालयाला प्रामुख्याने वार्षिक पुस्तिकेद्वारे मिळत असे. मात्र, त्यामध्ये प्रस्तावांचा केवळ गोषवारा उपलब्ध होत असल्याने सविस्तर माहिती आणि मूळ कागदपत्रांसाठी संबंधित विभागांशी स्वतंत्रपणे संपर्क साधावा लागत असे. त्यानंतर केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयांशी समन्वय साधून प्रस्तावांची सद्यस्थिती जाणून घेतली जात असे. ही माहिती संकलित करून मुख्यमंत्री कार्यालयाला अहवाल सादर केला जात असे. या प्रक्रियेत वेळ आणि प्रशासकीय समन्वयासाठी मोठे प्रयत्न करावे लागत होते.

नवीन पोर्टलमुळे ही प्रक्रिया डिजिटल स्वरूपात एकत्रित होणार आहे. राज्य शासनाचा कोणताही विभाग केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याची प्रत पोर्टलवर अपलोड करू शकेल. प्रस्ताव अपलोड होताच निवासी आयुक्त कार्यालयाला स्वयंचलित सूचना (अलर्ट) प्राप्त होईल. त्यानंतर संबंधित मंत्रालयाशी समन्वय साधून प्रस्तावाचा पाठपुरावा करता येईल.

केंद्र सरकारच्या मंत्रालयाकडून प्राप्त होणारे अभिप्राय, अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, प्रस्तावातील त्रुटी, आक्षेप किंवा आवश्यक स्पष्टीकरण यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात येईल. संबंधित राज्य विभागांना ही माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याने आवश्यक पूर्तता करून प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तातडीने सादर करता येईल.

या प्रणालीमध्ये प्रत्येक प्रस्तावाशी संबंधित पत्रव्यवहार, अभिप्राय, पाठपुराव्याच्या नोंदी आणि वेळोवेळी झालेल्या कार्यवाहीचा संपूर्ण इतिहास उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे प्रस्तावाची सद्यस्थिती आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा एका क्लिकवर घेता येईल.

पोर्टलवरील डॅशबोर्ड सुविधेमुळे केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांकडे किती प्रस्ताव प्रलंबित आहेत, कोणता प्रस्ताव किती कालावधीपासून प्रलंबित आहे, सर्वांत जुना व नवीन प्रस्ताव कोणता आहे, याची माहिती तत्काळ मिळणार आहे. विभागनिहाय आणि कालावधीनुसार प्रस्तावांचे वर्गीकरण करून विविध अहवालही तयार करता येणार आहेत.

निर्णयप्रक्रिया आणि प्रशासकीय कार्यक्षमतेला चालना

सर्व प्रस्तावांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विभागप्रमुख, सचिव तसेच मुख्यमंत्री कार्यालयाला प्रलंबित प्रस्तावांचा नियमित आढावा घेणे शक्य होणार आहे. प्रस्तावांच्या मार्गातील अडचणी वेळेत ओळखून त्यावर आवश्यक कार्यवाही करता येईल. परिणामी, केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्याच्या विविध विकासविषयक आणि प्रशासकीय प्रस्तावांच्या निपटाऱ्याला गती मिळण्यास मदत होणार आहे.

या अभिनव डिजिटल उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. या प्रणालीमुळे केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेले राज्य शासनाचे प्रस्ताव मार्गी लावणे आणि त्यांचा निपटारा अधिक वेगाने करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या उपक्रमाच्या संकल्पनेसाठी निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड आणि पोर्टल विकसित करणाऱ्या महाआयटीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ‘कॉरेस्पॉन्डन्स मॉनिटरिंग सिस्टीम’ हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रम ठरणार आहे.

Exit mobile version