विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्रे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळत आहेत. त्यातच भाजपाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर राज्यातील अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहिर केली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी उमेदवारी जाहिर न झालेल्या नाराज उमेदवारांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर एकच गर्दी केली. त्यामुळे सागर बंगल्यावर नाराजांच्या लाटा येऊ लागल्या आहेत. आज दिवसभरात नाशिक, मुंबईतील अनेक उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांची आणि राज्यातील काही विद्यमान आमदार पण उमेदवारी यादीत अद्याप नाव न आलेल्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर एकच रिघ लागली. महाराष्ट्राच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हेच उमेदवारांची नावं फायनल करीत असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पहिली यादी जाहीर झाल्यानंतर आणि दुसरी जाहीर होण्यापूर्वी फडणवीसांच्या ‘सागर’ला भरती आली
आहे.
भाजपाची सगळी सूत्रं पक्षाच्या मुख्यालयातून चालत होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याला महत्व आलं आहे. तिकीट इच्छूक, नाराज आणि तिकीट मिळालेले सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचत आहेत. यातील सर्वाधिक गर्दी ही मुंबई, पुण्यातली आहे. फडणवीस नियमितपणे नागपुरात मुक्कामी असतात. त्यामुळे विदर्भातील भाजपाचे बहुतांश नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायची असल्यास नागपुरातील ‘टायमिंग’ साधतात. विदर्भातील अनेक नेत्यांसाठी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात अनेक दुवे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, संदीप जोशी, विक्की कुकरेजा, प्रवीण दटके असे अनेक नेते सतत फडणवीसांच्या संपर्कात असतात. मात्र मुंबई, पुण्यातील नेत्यांना मुंबईतच फडणवीस यांना संपर्क साधावा लागतो. त्यामुळे अनेक नेते आतापासून ‘सागर किनारे’ बसून आहेत.
निवडणुका जवळ असल्याने मुंबईतील सागर आणि नागपुरातील देवगिरी हे दोन्ही बंगले सध्या गर्दीने फुलले आहेत. सोमवारी बबनराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, भारती लव्हेकर, भीमराव तापकिर, बाळा भेगडे, सुनिल राणे, अतुल शाह आदी अनेक नेते विधानसभा निवडणूकीतील उमेदवारीसाठी ‘सागर’वर ठाण मांडत होते.
भाजपाची पहिली यादी जाहीर होताच काही ठिकाणी बंडाची ठिणगी पडली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. येथे चंद्रकांत पाटील यांच्या नावाला विरोध आहे. त्यानंतरही त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपाचे स्थानिक नेते अमोल बालवडकर बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळं सुवर्णा पाचपुते यांनी आपल्या कार्यालयातील भाजपा नेत्यांचे फोटो आणि चिन्ह हटवले आहे. कोथरूडमधील भाजपाचे स्थानिक नेते अमोल बालवडकर बंडखोरी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
