Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, त्या आश्वासनांच्या ‘सौगात’चे काय झाले?

नरेंद्र मोदी एक राजकीय व्यक्तीमत्व म्हणून २००२ साली गुजरात मध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर उदयाला आले. या दंगलीत मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकावर अत्याचार झाले, त्यांचे मॉब लिंचिंग झाले, ही सर्व जबाबदारी नरेंद्र मोदींची आहे असे तत्कालीन परिस्थितीत म्हटले गेले. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची जगाला, देशाला ओळख झाली. पुढे राजकारण करत असताना अल्पसंख्याक सामाजाला एकही तिकीट न देणे, एकही मंत्रीपद न देणे, मोदींच्या पक्षातील आणि त्यांच्या मातृसंस्थेतील सहकाऱ्यांनी या समाजावर अत्यंत खालच्या भाषेत अपमानजनक वक्तव्ये व अत्याचार केले. हे सर्व पाहता सौगात-ए-मोदी म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली हज को चली, असे आहे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

ईद निमित्त भारतीय जनता पक्ष ३२ लाख मुस्लीम कुटुंबाला ‘सौगात-ए-मोदी’ कीट देणार असल्याच्या मुद्द्यावर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, ही ‘सौगात’ देत असताना दर वर्षी दोन कोटी रोजगार देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला दिडपट भाव देणार, विदेशातील काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, पेट्रोल ४० रुपये तर डिझेल ३५ रुपये लिटरने देणार, अशी आश्वासने २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिली होती, त्या ‘सौगात’ची देश आजही वाट पहात आहे, आठवणही यावेळी करून दिली.

Exit mobile version