राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार शब्द काढत नाही. सरकारने या संकटाचे गांभिर्य लक्षात घेऊन शेतकऱ्याला सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करावी यासाठी काँग्रेस पक्ष मे महिन्यापासून सातत्याने मागणी करत आहे. शेतकऱ्यांचे सर्वकाही पावसाने हिरावून घेतले आहे. पिकं तर गेली आहेतच लाखो हेक्टर जमीनही खरवडून गेली आहे. अशा वेळी मायबाप सरकारने भरघोस मदत करण्याची अपेक्षा असते पण आधीचे कृषीमंत्री रमी खेळण्यात व्यस्त होते तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नाहीत. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवे पण त्यांनाही वेळ नाही. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. आता रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी अशी मागणीही यावेळी केली.
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नाही ‘दरोडेखोर’…
पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पावसामुळे मुंबईतील रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत, पण महानगरपालिका कुठेही काम करताना दिसत नाहीत. मुंबई महापालिकेकडे ९० हजार कोटी रुपयांच्या बँक ठेवी होत्या त्यावर महायुती सरकारने दरोडा टाकला असून वरून १३०० कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. महायुती सरकारने महानगरपालिकेवर प्रशासक नाही तर दरोडेखोर बसवला असून मुंबईकरांच्या पैशांची लुट सुरु आहे, याप्रकरणी श्वेतपत्रिका काढा अशी मागणीही यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी..
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बंगळूरु येथील मेट्रो स्टेशनच्या नामविस्तारावरून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली आहे. यातून उच्चविद्याविभूषित देवेंद्र फडणवीस यांच्या अज्ञानाचे दर्शन झाले. वास्तविक पाहता शिवाजी नगर हे एका परिसराचे नाव असून त्या भागात दोन मेट्रो स्टेशन आहेत. नाव बदलण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, पण शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस यांनी माहिती न घेता आपल्या सवयीप्रमाणे खोटे बोलून दिशाभूल केली, त्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी करत खरे पाहता भाजपा परिवारानेच सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केलेला आहे. सावरकर यांनी महाराजांबद्दल काय लिहिले आहे हेही फडणवीसांनी वाचावे. विशेष म्हणजे ज्या शिवाजी नगरवरून हा वाद घातला जात आहे तेथे मुस्लीम व अनुसूचित जाती बहुल जनता आहे, त्यांनी कधीही या नावाला विरोध केला नाही किंवा नाव बदला असे म्हटलेले नाही. पण फडणवीस जाणिवपूर्वक खोटे बोलून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावेळी केला.
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो….
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अशोक चव्हाण यांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिली, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनाही मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशी महत्वाचे पदे मिळाली, असा ‘वनवास’ सर्वांना मिळावा अशी भावना पक्ष कार्यकर्त्यांची आहे, असा टोलाही यावेळी लगावला.
मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे रोजगार मेळावा..
शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यात २.५ लाख सरकारी जागा रिक्त जागा असतानाही सरकार मात्र नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून १६ सप्टेंबर रोजी टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.
