Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, पुण्यातील… त्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करा

राज्यातील पोलीस यंत्रणा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे. गुन्हेगार मोकाट फिरतात आणि पोलीस मात्र सर्वसामान्य जनतेवर कायद्याची दंडेलशाही दाखवत आहेत. पुण्यातील कोथरूड पोलीसांनी तीन तरुणींच्या घरात घुसून त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले,  त्यांना जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. ज्या पोलिसांनी हा प्रताप केला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का केली जात आहे? या पोलिसांवर अट्रॉसिटी कलमाखाली तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एका महिलेला मदत केल्याच्या कारणावरून या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींच्या घरात घुसून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. या मुजोर पोलिसांना कोण पाठिशी घालत आहे? पुण्याचे पोलीस आयुक्त काय खुर्चीवर बसून झोपा काढतात काय. कोणाच्या दडपणाखाली पोलीस काम करत आहेत. तीन तरूण मुलींवर पोलीस अत्याचार करतात आणि कारवाई होत नाही. एफआयआर नोंदवण्यास कोणत्या मुहुर्ताची वाट पहात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जातीने या प्रकरणी लक्ष घालून मुजोर पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही यावेळी केली.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यात ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे, कोयता गँगचा हैदोस सुरु आहे, त्याला आळा घालण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. पुण्यात दादागिरी वाढली आहे असे खुद्द मुख्यमंत्रीच जाहीरपणे सांगत आहेत पण कारवाई मात्र करत नाहीत, असा हतबल मुख्यमंत्री काय कामाचा. पुणे पोलीसांनी सर्वसामान्य लोकांना कायद्याचा नाहक बडगा दाखवण्याऐवजी पुण्यातील अवैध धंदे व गुन्हेगारी मोडीत काढण्याचे काम करण्याची गरज असल्याचे मतही यावेळी व्यक्त केले.

Exit mobile version