Marathi e-Batmya

महायुतीत “सब कुछ (ठिक) ठाक है” एकनाथ शिंदे यांच्या सहभागाबाबत अनिश्चितता कायम

राज्यात संशयातीत बहुमत मिळविल्यानंतरही मंत्री पदाच्या वाटपावरून महायुतीत सारेच काही आलबेल नसल्याचे चर्चा सुरु झाली आहे. महायुती सरकारने रितसर सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर उद्या संध्याकाळी ५.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महायुतीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे. मात्र राज्याचे विद्यमान काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्वतः एकनाथ शिंदे यांनी दिल्याने महायुती मध्ये सब कुछ ठिकठाक है सारखे परिस्थिती नसल्याचे बोलले जात आहे.

महायुती सरकारमध्ये जागांच्या संख्या बळानुसार मुख्यमंत्री होईल असे या आधीच जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार सर्वाधिक जागा भाजपाने लढवित १३२ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदी भाजपाचा आमदारच मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असे यापूर्वीच स्पष्ट झाले. तर दुसऱ्याबाजूला अजित पवार यांनी निवडणूकीचा निकाल जाहिर होताच लगेच भाजपाला पाठिंबा जाहिरपणे देत भाजपाच्या मुख्यमंत्र्यांला पूर्ण पाठिंबा राहणार असल्याचेही जाहिर केले. त्यामुळे अजित पवार यांचे राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान राहणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाईलाजाने तिसऱ्या स्थानी विराजमान होण्याची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अजित पवार हे राज्य मंत्रिमंडळात स्थानापन्न होणार असतील शिवसेना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान राहुन मंत्रिमंडळात मात्र तिसऱ्या स्थानावर कसे बसणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात दुसरे स्थान पाहिजे याकरिता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून सातत्याने भाजपाकडे गृहमंत्री पदाची मागणी करत आहेत. मात्र भाजपाच्या धमकाविण्याच्या ऐतिहासीक पार्श्वभूमीवर गृहमंत्री पद एकनाथ शिंदे यांना देण्यास तयार नाही.

त्यातच महायुतीच्या तिन्ही नेत्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतही सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय अद्याप घेतलेला नसल्याचे सांगत त्याबाबत थोडं थांबा संध्याकाळ पर्यंत त्याची अधिकृत माहिती सर्वांना कळेल असे सांगत अप्रत्यक्षरित्या सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

त्यावर भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची विनंती केली.

त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी अडून बसले असून गृहमंत्री पद मिळाल्याशिवाय राज्य मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गृहमंत्री पदावरून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मागील काही दिवसांपासून चर्चा करण्यात येत आहे. त्यातच आज सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अतिशय खेळीमेळीत पत्रकार परिषद झाल्यानंतरही गृहमंत्री पदावर अडून राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा वर्षा या निवासस्थानी पोहोचले आहेत. मात्र गृहमंत्री पदाचा हट्ट एकनाथ शिंदे हे सोडण्यासाठी तयार नसल्याने कदाचीत एकनाथ शिंदे यांच्या सहभागाशिवाय उद्या राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Exit mobile version