विरोधी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गर्जना मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आपला सहभाग नोंदवला व निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करते असंही ते म्हणाले.
आपली भूमिका स्पष्ट करताना जयंत पाटील म्हणाले की, लोकशाही आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या मागणीला आमचा ठाम पाठिंबा आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि ‘व्होट चोरी’च्या आरोपांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी होणे गरजेचे आहे. वारंवार व्होट चोरीच्या तक्रार होऊन देखील त्यावर काही कृती केली गेली नाही. त्यामुळे या व्होट चोरीला वरिष्ठांचा देखील पाठिंबा आहे. सत्तारूढ पक्ष पुन्हा पुन्हा निवडून यावा यासाठी ज्ञानेश कुमार आणि त्यांची टीम काम करत असल्याचा संशय लोकांना आहे. म्हणून ते लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होत आहेत असे ते म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, २०२४ साली आमदार जितेंद्र आव्हाड आणि मी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या गैरप्रकारांकडे लक्ष वेधले होते. मात्र, त्यावेळी अपेक्षित कार्यवाही झाली नाही. आज त्याच प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहत आहे. माझ्या पक्षातील तसेच महाविकास आघाडीतील अनेक उमेदवार अत्यंत कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले. मत चोरीमुळेच हा पराभव झाला आहे, असे म्हणायला आता वाव आहे. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात आणि मतदार याद्या पारदर्शक असाव्यात अशी मागणीही केली.
