Marathi e-Batmya

वरळीतील टेस्टिंग लॅबच्या भूखंडावर बहुमजली रोबोटिक पार्किंग प्रकल्प आणि इमारतीच्या टेंडरची चौकशी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने वरळीतील महापालिकेच्या टेस्टिंग लॅबच्या जागेवर बहुमजली रोबोटिक पार्किंगसाठी काढलेल्या टेंडरबाबत तसेच ई वार्ड कार्यालय बांधकाम रेंगाळत ठेवल्याबाबत नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली.

समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी यासंदर्भात गुरुवारी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता.

यावर बोलताना आमदार रईस शेख यांनी पुढे सांगितले की, वरळीच्या जी साउथ वॉर्डमधील म्युनिसिपल टेस्टिंग लॅब प्लॉटवर बहुमजली रोबोटिक पार्किंग बांधण्यासाठी बीएमसीने निविदा काढली होती, जिथे एकाच पार्किंग जागेसाठी महापालिकेला २७ लाख रुपये खर्च आला असता. प्रति दहा हजार चौ. फू.  दराने ही निविदा काढण्यात आली होती. यासंदर्भात तक्रार केल्यानंतर महापालिकेने सदर निविदा रद्द केली. या संदर्भात महापालिकेने जो खर्च केला, त्याचे काय? असा प्रश्न करत गेले चार वर्षे महापालिका प्रशासनाने जो भ्रष्ट कारभार केला. निविदा वाढवून काढल्या त्यासंदर्भात श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली.

आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबईतील ई वॉर्ड कार्यालय धोकादायक जाहीर करण्यात आले. त्यामुळे गेले दीड वर्ष हे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहे. त्यामुळे  कुठला अधिकारी कुठे बसतो याची माहिती नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.  या ठिकाणी एक कंत्राटदार आयकॉनिक इमारत उभारू इच्छित आहे. त्यामुळे कार्यालय बांधकाम करण्यास महापालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या चार वर्षाच्या प्रशासन काळाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. भाजपचे आमदार अमीत साटम यांनी गेल्या २५ वर्षाच्या काळातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

मंत्री माधुरी मिसाळ यांनी ई वॉर्ड कार्यालय बांधकाम प्रलंबित ठेवल्याबद्दल आणि जी साऊथ वॉर्डमध्ये पीपीपी तत्त्वावर बांधण्यात येणाऱ्या पार्किंग निवेदीची नगर विकास विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले.

विधानसभा अध्यक्ष राहून नार्वेकर यांनी गुणवत्तापूर्ण प्रश्न आमदार रईस शेख यांचे विचारल्याबाबत विशेष कौतुक केले आणि यासंदर्भात आपल्या दालनात एक बैठक घेण्यात येईल आणि ई  आणि जी साऊथ वॉर्ड मधील अडचणी सोडवण्यात येतील, असे जाहीर केले.

Exit mobile version