Marathi e-Batmya

उत्तम जानकर यांचा खळबळजनक दावा, १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड, युगेंद्र पवारच विजयी

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मतदारसंघातील मारकडवाडी गावात त्यांच्यापेक्षा भाजपाच्या उमेदवाराला मतदान जास्त झाल्याच्या मुद्यावरून गावात मतपत्रिकेवर मतदान घेण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र त्यास निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनाने आक्षेप घेतला. त्यामुळे पुढील होणारा संभावित संघर्ष टळला. त्याचबरोबर निवडणूक आयोग जर मतपत्रिकेवर मतदान घेणार असेल तर आपण आमदारकी पदाचा राजीनामा देऊ आणि पुन्हा निवडणूकीला सामोरे जावू असे आव्हानही यावेळी निवडणूक आयोगाला दिले. आमदार उत्तमराव जानकर हे आपल्या भूमिकेवर ठाम असून आज त्यांनी भूमिका स्पष्ट करताना १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड झाल्याचा दावा करत बारामतीत अजित पवार नाहीतर युगेंद्र पवार हेच विजयी झाले असल्याचा दावा केला. त्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आज बारामतीत आमदार उत्तम जानकर यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधला.

यासंदर्भात बोलताना आमदार उत्तम जानकर म्हणाले की, आपण ईव्हीएमचा अभ्यास केला असून विधानसभा निवडणूकीत महायुतीला बहुमतच मिळाले नाही. तसेच महायुतीला नेमक्या किती जागा मिळाल्या याची माहितीच आकडेवारीसह दिली.

यावेळी बोलताना आमदार उत्तम जानकर म्हणाले की, ईव्हीएममध्ये गडबड होत असून मतदान केल्यानंतर जी पावती बाहेर येते ती पावती मतदारांच्या हाती द्यायला हवी. तसेच त्या मतदारांने ती स्वतःहून त्यांच्या बॉक्समध्ये टाकायला लावण्याची परवानगी दिली पाहिजे अशी मागणीही यावेळी करत ईव्हीएममधील गडबडीची माहिती काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवार व निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देणार असल्याचेही यावेळी सांगितले.

आमदार उत्तम जानकर पुढे बोलताना म्हणाले की, विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान जवळपास १५० मतदारसंघात ईव्हीएम गडबड झाली आहे. याची सखोल चौकशी केली तर अजित पवार हे स्वतः २० मतांनी पराभूत झाल्याचे दिसेल असा खळबळजनक दावा करत अजित पवार यांना १ लाख ८० हजार मते मिळाली. त्यापैकी दोनास एक या प्रमाणे सुत्र वापरले तर युगेंद्र पवार यांना ८० हजार मते अधिक ६० असे मिळून एक लाख ४० हजार मते मिळालेली असून अजित पवार यांचा २० हजार मतांनी पराभव झाल्याचे दिसून येते असेही यावेळी सांगितले.

महायुतीला मिळालेल्या जागांबाबत बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, अजित पवार गटाचे केवळ १२ आमदार निवडूण आले. तर एकनाथ शिंदे यांचे केवळ १८ आमदार निवडूण आले. तर भाजपाचे केवळ ७७ आमदार निव्वळ निवडूण आले. त्यामुळे महायुतीला एकूण १०७ जागा मिळाल्या. आणखी दोन-चार अपक्षांचा विचार केला तर ही संख्या ११० वर जात असल्याचे सांगत मी सर्व मतदारसंघाचा अभ्यास केला असल्याचेही यावेळी सांगितले.

Exit mobile version