सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी
राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न दाखवित राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील अनेक आमदार, नेत्यांना भाजपाने गळाला लावत विरोधकांना निष्भ्रम करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचय असे सांगत राजकिय कुरघोडीत आपणही मागे नसल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत तोडीसतोड उत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिले.
सोलापूरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
तसेच मी आता घरच्यांना सांगितले, तुमचे आता तुमचे बघा. मला अनेकांना बघण्यासाठी बाहेर पडायचेय असे सांगत राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले आणि पक्षाला खिंडार पाडणाऱ्यांना आगामी काळात चांगलाच घाम फोडण्याची तयारी केल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून दाखवून दिले.
मी गेली अनेक वर्ष राजकारणात आहे. शरद पवार कधी बरं-वाईट केले म्हणून तुरुंगात गेला नव्हता. त्यामुळे तुरूंगात गेलेल्यांनी आम्हाला सांगू नये अशी उपरोधिक टीकाही त्यांनी भाजपा नेत्यांवर यावेळी केली.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पवारांनी काय केले ? असा सवाल केला होता. त्यास उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री असताना किल्लारी येथे भूकंपाची दुर्दैवी घटना घडली. तेव्हा सकाळी ७ वाजता हेलिकॉप्टरने तेथे पोहोचलो आणि तेथेच राहीलो. मात्र आताचे राजकारणी हेलिकॉप्टरमध्ये बसून पहाणी करून अर्ध्या तासात गायबही होतात असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांना त्यांनी लगावला.
मला अजून लय जणांना घरी पाठवायचय !
