Marathi e-Batmya

फडणवीस म्हणाले, वाचाळांना उत्तर द्यायला मला वेळ नाही

मुंबई: प्रतिनिधी

मुंबईतील ड्रग्ज रॅकेट फडणवीस यांच्या इशाऱ्यावर चालविण्यात येत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर केल्यानंतर माझ्या जावयाच्या घरी ड्रग्ज सापडले नसल्याची माहिती खुद्द एनसीबीनेच पुरविली आहे. तसेच माझे जर अंडरवर्ल्डशी संबध असल्याची माहिती होती तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही? असा सवाल करत तुम्ही मुख्यमंत्री असताना फोर सिझन हॉटेलमध्ये १५ लाखाचे टेबल बुक होत असत आणि पार्ट्या होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आज पत्रकार परिषदेत केला.

मलिक यांच्या आरोपावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, मला जे बोलायचे होते. ते मी काल बोललो आहे. आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे सांगत वाचाळवीरांना उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही. आता मी दिवाळीनंतरच बोलणार आहे.

त्यामुळे दिवाळीनंतर नवाब मलिक यांच्यासंदर्भात भाजपा नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काय गौप्यस्फोट करणार याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसऱ्याबाजूला मलिक यांच्या आरोपावार फडणवीस यांच्याकडे सध्या बोलायला काहीही नसल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यन खान प्रकरणी केलेल्या कारवाईवरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच राजकिय युध्द रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांच्याकडून भाजपाशी संबधित नेत्यांचे आणि एजंटाची नावे ज्या पध्दतीने फोटो आणि पुरावे देत आहेत. त्यास भाजपाकडून अद्याप तरी ठोसपणे प्रत्युत्तर दिलेले नाही. मात्र याप्रकरणी आता फडणवीस यांनी यास उत्तर देण्याचे सांगितल्याने दिवाळीनंतरही राजकिय आरोप-प्रत्यारोपांचे फटाके चांगलेच वाजणार असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version